दिनांक २२ एप्रिल,श्रीगोंदा:
देशात सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने रोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.त्यातच विविध मूलभूत प्रश्नांनी आधीपासूनच वंचित असणाऱ्या आदिवासी व भटके विमुक्त समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आणली असुन,तालुक्यातील हा समाज अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
सविस्तर माहिती अशी की,श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे जळीत वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी आणि भटके विमुक्त समाजाच्या वस्तीवर कोरोना रोगाच्या प्रार्दुभावामुळे उपासमारीची वेळ आली आहे.या वस्तीत भिल्ल समाजाचे २५ , पारधी समाजाचे ३१ ,डवरी गोसावी समाजाचे १५ ,व जोशी समाजाचे १४ , अशे एकुण ८५ कुटुंब रहात आहेत . या सर्वांची राहती घरं ही पाचराटाच्या पालांची आहेत .पक्के बांधकाम असलेले कोनाचेही घर नाही.यापैकी काही कुटुंबांचे उदरनिर्वाहचे साधन हे, यात्रेतील खेळणी विक्रीचा धंदा आहे.दरम्यान काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व यात्रा बंद आहेत.परिणामी त्यांच्या जवळ असणारी पुंजी भाडवलात गुंतवण्यात आली आहे.लागलीच रोजंदारी मिळत नसल्याने आम्ही जगायचं कसं ? हा प्रश्न विचारत आकाश शिंदे नावाच्या वस्तीतील तरुणाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रमोद काळे म्हणाले की,आजच्या घडीला कोरोना पासुन देश वाचविण्याचा एकमेव मार्ग हा लॉकडाउन आहे. मात्र,आजही आपल्या देशातील काही लोकांना दिवसभर काम केले तरच,संध्याकाळी त्यांची चुल पेटते.हे दुर्दैवी वास्तव आहे.परंतु,गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे येथील आदिवासी आणि भटके – विमुक्त समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लिंपणगाव सारखीच परीस्थिती तालुक्यातील इतर ठिकाणच्या मागासवर्गीय व आदिवासींच्या वस्त्यांमध्ये आहे.
त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे मुख्य व श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी याविषयी निर्णय घ्यावा व या उपेक्षितांच्या चुली पेटवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.अशी येथील सामान्य माणसाची अपेक्षा आहे. माळी यांच्या एका आवाहनावर अनेकांनी मदत केलेली आहे.तालुक्यातील इतर वंचितांना ही तहसीलदारांनी मदत देऊ केली आहे. तशीच आमचीही भूक भागवावी अशी मागणी येथील वंचित बांधव करीत आहेत. शासनाने आणि प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर उपाय योजना करुन या समाजातील वंचित कुटुंबांना दिलासा द्यावा.अशी मागणी यावेळी काळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत केली आहे.
