दिनांक २५ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात चार साखर कारखाने आहेत. एक शिरूर तालुक्याच्या जवळ, एक कर्जत तालुक्याच्या जवळ, एक तालुक्याच्या मध्यावर असून, एक नगरच्या जवळ आहे. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होऊन याठिकाणी हा उद्योग चालू आहे.
यासाठी लागणारे मनुष्यबळही आसपासच्या जिल्ह्यासह वेगवेगळ्या दुर्गम भागातून आलेले मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या मागास लोक यात मुख्यत्वे मजूर म्हणून, कार्यरत आहेत. मात्र, यांना यातून मिळणारे उत्पन्न हे आसपास असलेल्या दारू, मटका व जुगार अश्या अवैध धंद्यामुळे मजुरांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे मत वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम संघटना जिल्हा अध्यक्ष दादासाहेब पाडळे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रात त्यांनी नमूद केले आहे की, या कारखान्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि दारूचे अड्डे चालू आहेत. येथे कार्यरत मजूर, कारखान्यात काम करणारे कामगार दिवसभर अमानवीय कष्ट करतात. येथील मजूर पहाटे चारच्या सुमारास घराबाहेर ऊसतोडीसाठी गेल्यानंतर संध्याकाळी ऊसाच्या व्हाड्याच्या आणि मजुरीच्या माध्यमातून मिळालेला पैसा नमूद कामगारांच्या किंवा मजुरांच्या घरापर्यंत पोहचत नाही. मधेच या दारू दुकानदार, मटका किंवा जुगाराच्या माध्यमातून मार्गी लागतो. एवढे कष्ट करूनही त्यांच्या पदरी दोन पैसे राहणे तर दूर! मात्र, कारखान्याच्या अवतीभवती असलेल्या अवैध धंद्यांच्या जाळ्यामुळे ऊसतोडणी मजुरांवर दारिद्र्यासह उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फॅक्टरींच्या जवळपास चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याविषयी प्रसिद्धीपत्र दादासाहेब पाडळे जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे. बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढिकले यांनाही याबाबत विशेष लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास, येणाऱ्या कालखंडांमध्ये नमूद विषयी वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम संघटनेच्या माध्यमातून व्यापक जनआंदोलन करण्याचा इशारा पाडळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
स्त्रोत:(दादासाहेब पाडळे यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्र)
