कळा,उत्तम बंडू तुपे.(भाग १०).

कळा,उत्तम बंडू तुपे..

भाकरी खाताना उसावर नजर फिरत हुती . ऊस हालत हुता ; कुणी तरी उसांत हिंडत हुतं . म्हणलं – आसल कोण तरी . घटकाभरात भाकरी खाऊन सावलीत पडलो . तवर धोंडी उसांतनं आला . ” संतू ! सऱ्या वाईच खोल सोड , उथळ हुत्यात . उसाला भरपेट पाणी लागतं . सऱ्यांत पाणी साचून राया पायजी . ‘ कुठं न्हाय – व्हय करत बसता ? – नुसता मुंडकं हालवून गप उठलो.

शिरलो उसांत ; भूत शिरल्यागत . लागलो माती उदसयला . नेमानं पाच दिवस उसाची खांदणी केली . उसाच्या चिकट्यानं ; घामानं अंग काकवीच्या डेऱ्यागत झालेलं . घाम आला तरी , घाम पुसून काढायपुरती दिकून सवड घावत नव्हती . अंगाला खाज सुटलेली . उसाच्या पाल्यानं चिरलेल्या चिरण्या काळ्या पडलेल्या. कुठं कुठं चिरण्यांवरचं ढलपं निघून कोड फुटल्यागत चटं उठलेलं . अंगाचा उकिरडा झाला हुता नव्हं ! सकाळचं येरवाळी उठून कामाला निघालो हुतो . रातभर पावसानंबी दमवलं हुतं . घरांची चाळण रातभर गळत हुती . ह्या कामातनं घराकडंबी ध्यान दियाला घावत नव्हतं . कवा दुर्व्या पाचवीत गेला हुता ; तवा घर शेकारलेलं . गळायचं न्हायतर काय ; घरावरचं शेकरान कुजून खत झालं हुतं .

कुठं कुठं चिमण्यांचं खोपं . तरी घर शेकरायचं काय जमत नव्हतं . घर शेकरायचं म्हणलं तरी शे – पन्नास रुपयाला टोला . कुठं म्हणून हात दियाचा ? आपलाच विचार करत हुतो . पाऊल पडतेली तसं चालत हुतो नि खाज सुटंल तिथं खाजवत हुतो . उसाच्या वाड्याची खूस अंगात शिरून आंगाला फुटकुळ्या आलेल्या . पाठाच्या कडनं चाललो हुतो . नजर सारखी पाण्यावर फिरत हुती . पाण्यात पडावसं वाटत हुतं . पर मन बिथल्यागत झालेलं . सकाळचा गारठा . गार पाण्यात भिजून आजारी पडायचं भ्या . एक डोळा उगवती कडं ; एक डोळा पाण्याच्या पाठावर ठेवून चालत हुतो . एका वाटेला धा वाटा फुटलेल्या . आजून उन्हंबी पडली नव्हती . आभाळ ढगांनी टम भरलेलं . उजाडलं का न्हाय हेबी कळत नव्हतं . वाटेचाबी चिखल झालेला . उसाची वावरं पाण्यानं भरली आसली तर कामाचा खुळंबा . सरळ पाटानं खैरमाळातल्या वडाजवळ आलो ; तर गुपित म्हसोबा पाण्यातनं उठल्यागत आबा सुतार उठला . घटकाभर त्याच्याकडं बघत बसावं वाटलं . ” आबा ! झाली व्हय अंघुळ ? ” “ ये ये ; संतू ! बरा आलास ; दगडानं माझी पाठण तरी घास .

लई मळ झालाय बघ .“ पाठणीचा मळ तुला रं कसा दिसला ? का पाठणीला डोळं हायतं तुझ्या ! ” “ तसं नव्हं . मायंदाळी खाज सुटलीय पाठणीला . ‘ चांगली दगडाची बारकी चिफ बघून घिटली . खसाखसा आबाची पाठण घासली . आबा पाण्यात जावून बसल्यावर अंगातली कापडं केळ सोलल्यागत काढली . लंगोटी लावून पाण्यात शिरलो . आंग भिजवून घितल्यावर हात पुरल तिथवर दगडानं घासलं . घासलं तसं खाज जिरत हुती . मन थंड झाल्यागत वाटत हुतं . निर्मळ आंघोळ चालली हुती . आबाकडून पाठण घासून घितली ; आबा सावकास पाठण घासत हुता . हजामत करताना न्हावी पाण्याचा वापर करतो तसा आदनं – मधनं पाठणीवर पाणी फिरवत हुता . पाण्यात बसलो हुतो तेवढ्या जागेत पाण्यावर मळाचा तवंग दिसंत हुता . ” संत्या ! ह्यो मळ का माती रं , कवा अंघोळ करतो का न्हाय तू ? ” ‘ आबा ! ह्या चार – पाच दिवसांत बनलं न्हाय . कामातनं सवड हुती काय अंघुळीला ? ” ” अंघोळी करताना पाठण घासून घेत जा . माणसानं कसं झकपक आसावं . ‘ ” आबा ! आपून काय वाण्याबामनांचं हायक काय ; तास – तास पाणी अंगावर ओतून घियाला ? झकपक राहून कुठं घरात बसायचंय काय पाथीपुराण सांगत ? ” ” संतू ! माणसानं कसं सुवचं रहावं .

‘ ” ते मलाबी पटतंय ; पर कामानं सवडी व्हत्यात काय ? सकाळचं उठायचं ; घाईनं कावळ्यागत पाणी अंगावर घिटलं की झाली की अंघोळ . घाई – गडबडीत आंग भिजलं ; कुठं न्हाय भिजलं ; तर कामाला गाठ घालावी लागतीय . ‘ पाठण तांबडी लाल हूसतवर आबानं दगडानं चोळलं . दगडाची चिफ माझ्या हातांत दिली . “ संतू ! हातपाय चांगलं घास . एकाद दिवसीतरी माणसागत ” अंघोळी कर . बोलता बोलता आबानं कापडं घातली . निघून गेला . मन लावून हातपाय घासलं. अंगावरली कापडं पाण्यातनं चोळून आपटून धुतली. लखलखीत झालो . तवा ढगांतनं सूर्य उगवल्यागत दिसला. काळीज लख करून हाललं . न्याहरीच्या वक्ताला सूर्य आला हुता. आता धोंडी कारभारी काय धड बोलणार हाय ? पाण्यातनं उठलो . वलीच कापडं घेवून तकाट उंबर मळ्याची वाट धरली . सगळं आंग मोकळं झाल्यागत वाटत हुतं . मनाला एक वेगळीच उभारी आली हुती . झाकून ठिवलेल्या ठेवणीच्या कापडागत आंग दिसत हुतं .” मळ्यात आलो ; उसाच्या कडनं एक फेरी मारली . उसाच्या सऱ्या ठणठणीत दिसल्या . राती ह्या बाजूला पाऊस झाला नव्हता .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

कुदळ उचलली तसा उसात शिरलो . भान नसल्यागत खसाखसा सऱ्या उकरत मागं सरायला लागलो . उकरलेली माती नीट उसाबुडी लावत हुतो . मुळ्यांचा जारवा तोडून बाजूला सारत हुतो . उसाची पानं अंगावरनं तलवार फिरवल्यासारखी ; साजूक अंगावर चिरण्या उठत हुत्या . भुई नांगरानं फाळल्यागत पानं अंगाला चिरंत हुती ; नि भुयारात शिरल्यागत उसांत दम कोंडत हुता . घुसमटून घातल्यागत वाटत हुतं ; तरी खांदणी चालली हुती . कवळी दुपार झाली तवा धोंडी कारभारी मळ्यात आला . त्यानं उसाच्या बाहेरनं हाक मारली ; तवा उसातनं बाहेर आलो . ” संतू ; कामाला कवा लागला रं ? ” ” रोजच्या टायमाला ; का ? ” ” खोटं बोलू नगस ; तुला काय वाटलं माझं ध्यान न्हाय व्हय ? ” ” झाला आसंल वाईच उशीर ; तर सांजचं घटकाभर काम करीन . त्यात काय येवढं ? ” ” सांजचं पार गडाद पडल्यावर सुटी करायची . न्हायतर आजचा रोज अर्धा धरीन ;

किती दिवस झालं आज ? ” ‘ आजचा सातवा दिवस हाय.” तुला काय पायजितं का रुपयं खर्चायला ? ” “ नगं . तुमचं तुमी वळती करून घ्या ; आजून तीन रोज तुमच्यात काम करीन मी . “ का ? काय झालं ? हाय तेवढा ऊस खांदून दे की . ‘ “ ह्या रोजगारात आपल्याला परवडंत न्हाय . ‘ ” मंग दुसरीकडं काय शंभर रुपयं रोजगार हाय काय ? तुला जुंधळं घातलं . तुझी यळ जाणली . कुणाकडून व्याजानं रुपयं काढलं आसतं तर व्याज दियाला लागलं नसतं काय संतू ? ” “ धोंडी ! तुमासनी काय म्हणायचं ते सरळ बोला की . ‘ “ सरळ काय नि वाकडं काय ? व्याजाच्या पैशांत आणखी चार रोज काम करायचं . ” मंग आसं करा ; आता दुसरा रोजगारी बघा . तुमचं रुपयं मी सांचला देतो . ‘ कुदळ खांदयावर टाकून तडक घराची वाट धरली . फिरून माघारी ” ” बघितलंबी न्हाय .घराकडं जाणारी वाट चालत हुतो . मन सैरभैर झालं हुतं . आसंच कुठं तरी लांब निघून जावं वाटायला लागलं .

मिसाळाच्या नादानं नारायण चव्हाणाचा मळा सोडला हुता . धोंडी कारभारी फुकटात राबवायला बघत हुता . घातलेल्या जुंधळ्याच्या पैशांत पंधरा दिवस राबायचं मंजी काय ? अंगावर ऊस खांदणीची कामं घिटली ; तर पंधरा दिसांत एकरभर रानाचा रगडा व्हतूं . दोन – आडीचशाचं काम हुतंय ; ईचार करत निघालो हुतो . चालता चालता चव्हाणाच्या मळ्यात नजर टाकली ; तर चव्हाणाच्या मळ्यात बैलं . चव्हाणानं माघं गेल्या साली बैल बादीना पार इस्कटून टाकला हुता . बैलं दिसली म्हणताना मळ्यात गेलो . नारायण चव्हाण बांधावर बसला हुता . ” रामराम मालक ! काय चाललंय . ” “ संतू ! ऊस खांदून घेतोय . ” ” बैलं कवा घिटली मालक ? ” “ झालं चार – पाच दिवस ; वडूजाच्या बाजारात खरेदी केली . बघ की ऊस खांदायचं यंत्रबी आणलंय . ” नारायण मालकामागनं उसांत गेलो . उसांच्या खांदणीची खोली कुदळीच्या खांदणीपेक्षा खोल ; नि बाजूची मातीबी उसाबुडी दाबून बसलेली . यंत्राला बैलं जोडली हुती . हातभर यंत्राचा फाळ भुईत शिरून माती उसाबुडी हातानं लावल्यागत बसत हुती ; खादणीचं यंत्र बघून भवंडायला लागलं . यंत्राचा फाळ पोटात शिरून पोट फाडायला लागलेला . पोट मातीचं का आपलं ? आपलंच पोट मातीवर पडलेलं . मातीसंगट जलमाचं जोडलेलं नातं तुटत चाललेलं . मातीतली रग रगतात भिणलेली . मातीत राहून माती झालेला ; आता मातीचं परकेपण जाणवायला लागलं . बिनओळख्यागत माती लांब राहून बघत आसल्यागत वाटलं . उसाच्या मुळ्यांचा जाखा तुटून पडत हुता . जाख्यात नजर गुतली हुती ; सगळं इसरून त्या जाख्याकडं बघत हुतो . जाख्याची तुटकी मुळं धरून मोठ्यानं आरडावं वाटत हुतं . उसांतनं परक्यागत बाहेर पडलो . ह्या , ह्या हातानं लावलेला ऊस ; परका परका वाटत हुता . किती वक्ताला ही माती उजरली आसंल ; नांगरली आसंल ; फणली आसंल ; मऊ मातीतनं कुळव फिरवला आसंल . शिणलो भागलो तर मातीवर अंग टाकून घटकाभर विसावा घिटला आसंल . ह्या मातीला आता आपली गरज न्हाय . तिनं यंत्राला मिठी मारलीय . सख्या आयपरास जीव लावणारी माती आता सवतीच्या पोराकडं बघितल्यागत बघतीय ; तिचीबी कळा पार उतरलीय .

सहा महिन्यांचं दुखणं घेवून पडल्यागत पडलीय . आपली ही दशा तिलाबी बघवा का काय ? “” पोटदुखीचा आजार झाल्यागत पोट धरून उठलो . मळ्यातली बैलं सुटली हुती . यंत्रबी कुत्र्यागत गुरकून बघत आसल्यागत वाटलं . बैलं शेपटं हालवत निघाली . तीबी म्हणत हुती वाटतं – “ जा बा ; कशाला आलास हितं ? तुझं आता कुणी राहिलं न्हाय . खाली मान घालून मढं सावडून निघाल्यागत चाललो हुतो . भुईला काट फुटल्यागत तळपायाला टोचत हुतं . कुपावल्या दोडक्यागत अंतराळी चालत हुतो . वस्तीवर आलो तवा खाली तळात नजर टाकली . हिरवीगार शालू आंथरल्यागत द्राक्षाची बाग पसरली हुती . द्राक्षाचं वेल हातपाय पसरून कुठं निघालं हुतं . डोळ्यांत द्राक्षाची बाग बसली . जिवात रस उतरल्यागत जीव हिरवा झाला . ” मालक ! द्राक्षाची बाग … ‘ ” संतू ! बाग कापायला आलीय ; तुझ्याशिवाय कुणाला जमायचं न्हाय . मालक बोलला . नजर फिरत फिरत वठलेल्या पिंपळावर गेली . वठलेल्या पिंपळाला पालवी फुटली हुती . फुटलेली कवळी पानं आत आत सळसळत हुती . ” पिंपळ खुशीनं हासत हुता …

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading