दिनांक ६ जून २०२६ अहिल्यानगर:
अहिल्यानगर (अहमदनगर) शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक आणि स्नेहालयच्या ९०.४ एफएम ‘रेडिओ नगर’चे माजी संचालक श्री. भूषण गोपाळ देशमुख यांचे आज, शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी मोठी हानी झाली असून, शहराने इतिहासाचा एक चालता-बोलता ज्ञानकोश गमावला आहे.

निजामकालीन इतिहासाचा खडा न् खडा अभ्यास असलेले भूषण देशमुख हे नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असायचे.
शहरात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे ते मुख्य प्रेरणास्थान होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचे जवळून दर्शन घडले.
आपली लेखणी, व्याख्याने आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक पिढ्यांना इतिहासाचे अचूक, संदर्भपूर्ण आणि जिवंत स्वरूप अनुभवून दिले. नगरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यांचे हे कार्य इतिहास संशोधक, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.

दिवंगत भूषण देशमुख यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ‘रेडिओ नगर’, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर येथे ठेवण्यात आले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६.०० वाजता अमरधाम, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
भूषण देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
स्रोत:(सामाजिक माध्यम)
