श्रीगोंद्यात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर सराईत गुन्हेगाराचा जीवघेणा हल्ला; सिद्ध घाट परिसरातील घटना..

दिनांक ६ जून २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील सिद्ध घाट परिसरात काल सायंकाळी एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. एका मद्यधुंद सराईत गुन्हेगाराने ससाणे नगर येथील एका अल्पवयीन मुलावर केलेल्या भीषण हल्ल्यात मुलाच्या नाकाचे हाड तुटून तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, वाढत्या व्यसनाधीनतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सिद्ध घाट परिसरात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी पूर्णपणे नशेच्या धुंदीत असलेल्या एका इसमाने तिथे असलेल्या ससाणे नगर येथील अल्पवयीन मुलावर हल्ला चढवला.

हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात पीडित मुलाच्या नाकावर गंभीर दुखापत झाली आणि नाकाचे हाड तुटले. हाड तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.

घटनेनंतर जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखम खोल असल्याने आणि रक्तस्राव थांबत नसल्याने, प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलाचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारा आरोपी हा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर चोरी, मारहाण आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

श्रीगोंदा शहर आणि परिसरात सध्या अल्पवयीन मुले तसेच १८ ते २० वयोगटातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढताना दिसत आहे. मद्यधुंद अवस्थेतील या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शहरातील याच वाढत्या व्यसनाधीनतेच्या विळख्याविरोधात आणि अवैध धंद्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते लवकरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बोलले जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Ai genrated इमेज चा वापर करण्यात आला आहे..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading