राष्ट्रीय महामार्ग 548 D चे काम प्रगती पथावर: अनिल ठवाळ व ग्रामस्थांच्या संघर्षाला यश..

दिनांक १ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

मुंबई मंत्रालयातील नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग 548 D च्या उर्वरित कामांसाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला असून, संबंधित मागण्या अंशतः मंजूर झाल्या आहेत.

उपोषणातून आंदोलनाला गती
३१ डिसेंबर २०२४ रोजी आढळगाव एसटी स्टँड समोर ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला. उपसरपंच अनुराधाताई ठवाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, व इतर ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. यामध्ये आढळगाव हद्दीतील ६०० मीटर रस्त्याचे काम, इलेक्ट्रिक पोल, गटार लाइन, मंदिरे, ओटा, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय समोरील ओव्हर ब्रिज (एक कोटी वीस लाख रुपयांचा सुंदर पूल), सुसज्ज बसस्थानक, डिव्हाइडर व वृक्षारोपण यांसारख्या प्रलंबित कामांच्या तातडीने पूर्णतेची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल
मुंबई मंत्रालयातील बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री, मुख्य अभियंता दयानंद विभुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उर्वरित कामासाठी नियुक्त एजन्सीला सर्व कामे पूर्ण केल्यानंतर शिल्लक रक्कम व वाढीव निधी मंजूर करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

मुख्य अभियंता विभुते साहेब यांनी अनिल ठवाळ यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

उपोषणस्थळी उपस्थित शाखा अभियंता सौ. इनामदार मॅडम, दिंडोरे साहेब, व निखिल कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर लहू पाटील यांनी आढळगाव येथील विविध प्रलंबित स्थळांची पाहणी केली. लक्ष्मी माता मंदिर, तूकाई माता मंदिर, हायस्कूल समोरील ब्रिज या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाची स्थिती निश्चित करण्यात आली.

आश्वासनानंतर उपोषण मागे
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात हनुमंत डोके, सत्यवान शिंदे, सचिन शिंदे, सागर वाकडे, पै. माऊली उबाळे, अमोल डाळिंबे, संग्राम भालेराव, संपा काळे, पांडतात्या काळे, जगधने अण्णा, दिगांबर होले व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बैठकीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग 548 D चे काम लवकरच पूर्ण होईल आणि आढळगाव ग्रामस्थांच्या संयमी संघर्षाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply