दिनांक २ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील २२,००० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळत नाही, ही गंभीर बाब असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील ४२९ शाळांमधून शालेय पोषण आहाराची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पुरवठादाराने वेळेवर पुरवठा न केल्यामुळे तब्बल २२ हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शालेय पोषण आहार महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना एकही दिवस पोषण आहारापासून वंचित ठेवता कामा नये. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील विद्यमान परिस्थितीमुळे पालक वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याला जबाबदार कोण?” असा सवाल पालक करत आहेत.

तालुका गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा अडचणीमुळे पोषण आहार बंद आहे, याबाबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोषण आहार एकही दिवस बंद ठेवता कामा नये, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

राम घोडके सरपंच वडघुल यांचा इशारा:
“शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर येत्या दोन ते चार दिवसांत पुरवठादाराने पोषण आहार पुरवला नाही, तर आम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करू,” असे राम घोडके यांनी स्पष्ट केले.

कामठी, वडघुल, मांडवगण, हिरडगाव, चांडगाव, घोडेगाव यासारख्या गावांमध्ये पोषण आहार न मिळाल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे.
स्रोत:(राम घोडके)
