श्रीगोंदा, दिनांक ३ जानेवारी २०२५:
राजापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन श्री श्रीपाद कवाष्टे, व्हा. चेअरमन श्रीमती अंजूबाई धावडे आणि संचालक मंडळाच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी संस्थेच्या २०१६ ते २०२२ या कालावधीतील आर्थिक कामकाजाचे फेर लेखापरिक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत.

संस्थेतील अनियमितता आणि तक्रारींच्या चौकशीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लेखापरिक्षणासाठी श्री. महेंद्र तुळशिराम घोडके यांची नियुक्ती करण्यात आली असून, अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील २०१६ ते २०२२ दरम्यानच्या कामकाजातील आर्थिक अनियमितता आणि अपहार प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (३)(क) अन्वये चाचणी लेखापरिक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी या संदर्भात श्री. घोडके यांची लेखापरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

चौकशी अहवालात संस्थेच्या व्यवहारात अनियमितता, सभासदांच्या कर्ज वाटपातील त्रुटी, संगणकीकरणातील दोष, तसेच आर्थिक व्यवहारात अपारदर्शकता असल्याचे निष्पन्न झाले. संस्थेचे दप्तर उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित संस्थांना देण्यात आले आहेत. लेखापरिक्षण अहवाल दोन महिन्यांत सादर करणे बंधनकारक आहे.

राजापुर सोसायटीतील सभासदांना चेअरमन श्रीपाद कवाष्टे यांचे आवाहन..
राजापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील चाचणी लेखापरिक्षणाच्या अनुषंगाने सोसायटीचे चेअरमन श्री श्रीपाद कवाष्टे यांनी सभासदांना आवाहन केले आहे की, सभासदांनी कोणतीही तक्रार किंवा शंका असल्यास थेट सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)
