“विठ्ठला कोणता झेंडा घेवु हाती?”
सध्या महाराष्ट्रातील वातावरण सर्वत्र निवडणुकांच्या गोंधळाने भारलेले आहे. विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हालचाली तीव्र झाल्या आहेत. जिकडे तिकडे वेगवेगळ्या आश्वासनांचे आणि घोषणांचे पाऊस पडत आहे. आमदारकी आणि मतदारांचे मन जिंकण्यासाठी अनेक उमेदवार रात्री-रात्र प्रचारात गुंतले आहेत. सभांमध्ये उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात, तर घरोघरी जाऊन मतदारांना विकास कामांचे, उज्ज्वल भविष्यातील स्वप्न दाखवले जात आहेत.
या निवडणुकीच्या रंगमंचावर एक वेगळाच नाट्यरंग पाहायला मिळतोय. काही पक्षांमध्ये टिकिट न मिळालेल्या उमेदवारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. काहीजण आपापल्या ‘जनसेवे’चा दावा करून इतर पक्षात प्रवेश करत आहेत, तर काही अपक्ष म्हणून उभे राहत आहेत. राजकीय निष्ठा जपण्याचे सोडून, अनेक उमेदवार त्यांच्या सोयीप्रमाणे पक्षांतर करत आहेत. हे पाहून मतदार देखील संभ्रमात आहेत – कोणता उमेदवार कोणत्या पक्षाशी जोडलेला आहे? त्यांचा उद्देश काय आहे?
सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांना आपला पक्ष “पवित्र” असल्याचा दावा करताना दिसत आहेत. ते गावागावात गेली अनेक वर्षे रखडलेले प्रश्न सोडवण्याची हमी देत आहेत. परंतु याच बरोबर एक वेगळे चित्र दिसत आहे. अनेक उमेदवार रातोरात पक्ष बदलत आहेत; कार्यालयांवरील झेंडे बदलत आहेत, घोषणापत्रे बदलत आहेत. यामुळे सर्वसामान्य मतदारांचा विश्वास उडत आहे. कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणाचा विरोधक हेच लोकांना कळेनासे झाले आहे. अशा गोंधळाच्या वातावरणात ‘अदृश्य शक्ती’सारखे पाठबळ मिळालेल्या बंडखोर उमेदवारांची चांगलीच चर्चा आहे. एकंदरीतच आश्वासनांचा महापूर सध्या निवडणूक प्रचारात वाहताना दिसतोय.
निवडणुकीत लोकांना जाती धर्मामध्ये अडकविण्याचा प्रयत्न सध्या जोमात आहे. या प्रचारसभांमध्ये मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवले जात आहे, आणि वाचाळविरांना बोलण्याची मोकळीक दिली जात आहे. रस्ते, पाणी, वीज, महागाई, बेरोजगारी, आणि अत्याचार असे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष, सर्वचजण चिखलफेक करण्यासाठी एकमेकांवर टीका करण्यास व्यस्त आहेत.
या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार एकमेकांवर जोरदार हल्ला चढवत आहे, परंतु निवडणूक निकाल लागल्यानंतर हेच विरोधक एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील हे सुद्धा सत्य आहे. राजकारणामध्ये कोणताही राजकीय पक्ष कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हीच या गोंधळाचे मूळ कारण आहे. सर्व पक्ष सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर टीका करत असले तरी मतदारांना यातील कुणीच स्थिर वाटत नाही.
प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सत्ताधारी पक्षाने कधीच सोडवले नाहीत, हेच दिसून आले आहे. त्यामुळे मतदारांनी जात, धर्म, पक्ष याकडे न पाहता, जो उमेदवार लोकांच्या समस्यांवर काम करतो, विकास घडवतो त्याच उमेदवाराला मतदान करावे. राजकारणातील गोंधळामध्ये फसून जाता कामा नये, तर एक सुजाण मतदार म्हणून निर्णय घ्यावा. अशाच लोकप्रतिनिधींना निवडले, तरच लोकशाही मजबूत होईल, आणि देश महासत्ता बनण्याच्या दिशेने जाईल.
परंतु, दुर्दैवाने सध्या गोंधळलेला मतदार एकच प्रश्न विचारतोय: “विठ्ठला, कोणता झेंडा घेवु हाती?”
(मूळ लेखक: महेंद्र मिसाळ यांचा लेख अनुवादित करण्यात आला आहे.)




