मराठवाड्यातील चिमुकल्यांचे विद्यापीठ..

बीड जिल्हा ऊस तोडणी मजुरांची धगधगती रणभुमी. ऊस तोडणीमुळे वर्षातील सहा महिने स्थलांतर करावं लागते . त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला जिल्हा. स्थलांतरामुळे काही शाळा फक्त कागदावर. अशा परिस्थितीत पाटोदा तालुक्यातील बालाघाट परिसरात वसलेल्या जरेवाडीची लोकसंख्या ३८० आहे. प्राथमिक शाळेत ऊस तोडणी मजुरांची ६६६ मुले शिक्षण घेत आहेत . शाळेचा परिसर पाहिला तर उंच डोंगरावरून एखादा दगड निखळला तर थेट शाळेच्या मैदानामध्ये येईल अशी जीवघेणी परिस्थिती. पण अशा परिस्थितीत ग्रामस्थांच्या सहभागातून शाळेचे रुपांतर बालविद्यापीठात झाले. या चिमुकल्याच्या पदस्पर्शाने गावाला गावपण आले .

१९९५ च्या पुर्वी जरेवाडी शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गात अवघे २४ विद्यार्थी होते. शाळा बंद पडते कि काय अशी अवस्था होती . संदिप पवार या शिक्षकाची बदली जरेवाडी शाळेत झाली अन परिवर्तनाचे पर्व सुरू झाले . पवार गुरूजी त्यांच्या सहका यांनी दर आठवड्याला मिटींगच्या माध्यमातून पालकांची शाळा भरविण्याचा जनजागृती उपक्रम हाती घेतला . शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले . विद्यार्थी गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिले. शाळेचा चेहरामोहरा बदलू लागला. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळेत आठवीपर्यत वर्ग सुरू झाले. शाळेत विद्यार्थी संख्या वाढली. ऊस तोडणी मुलांच्या शिक्षणाचा जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिरात जागर सुरू झाला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात नो ॲडमिश बोर्ड प्रवेश द्वारावर लावावा लागतो . हा दैवी चमत्कार नसून शिक्षकांच्या कल्पनेतून राबविलेल्या उपक्रमांचे फलित आहे . दररोज अर्धा तास परिपाठ घेतला जातो.घेतला जातो . त्यानंतर शालेय अभ्यास सुरू होतो . स्पर्धा परिक्षा , नृत्य , गायन , खेळ , स्काऊट आणि नाट्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते . ई – लर्निंग, टी . व्ही., कलादालन आदि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. सुविधांनी बोलक्या शाळेत शब्द लेखन, सुबोध परिक्षा, गणित , विज्ञान कोडे, कोण होईल जरेवाडीचा ज्ञानवंत ! असे उपक्रम राबविले जातात . विद्यार्थ्यांचे बुध्दी कौशल्य तपासले जाते. शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थी बचत बँक सुरू केली आहे. या बँकेत विद्यार्थ्यांच्या नावावर अडीच लाख रुपयांची शिल्लक असून सर्व व्यवहार विद्यार्थी करतात. त्यामुळे शालेय जीवनात बँकिग नॉलेज मिळत आहे. दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव भरविला जातो . यामधून दोन पेक्षा जास्त बक्षीसांचा पाऊस पडतो .

सामाजिक जाणिवेतून परिसरातील पाणी टंचाई मात करण्यासाठी चिमुकल्यांनी श्रमदानातून छोटा बंधारा तयार केला . पिंपळवाडी , जरेवाडी फाट्यापासून शाळेपर्यंतच्या रस्यावर दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे ही झाडी लक्ष वेधून घेत आहेत. यातून झाडे लावा पाणी अडवा हा संदेश दिला आहे . ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेची इमारत बांधली आहे. ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे . शाळेच्या कामात सरपंच मनिषा पवार स्कूल कमिटी सदस्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे . या ज्ञानमंदीरात चार तालुक्यातील ५५ गावातील विद्यार्थी असून ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या यशाच्या प्रवासात संदीप पवार यांना आदर्श राष्ट्रीय पुरस्कार सन २०१३ मिळाला. त्यामुळे इतर शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. भारतरत्न डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शाळा जरेवाडी प्राथमिक शाळा भारताच्या शैक्षणिक नकाशावर झळकली आहे. इतर शाळांना जरेवाडीची शाळा दीपस्तंभ ठरली आहे.

शब्दांकन: आरीफभाई शेख, मुक्त पत्रकार, अंतरराष्ट्रीय विश्लेषक.

जरेवाडी शाळेकडे ग्रामस्थ, पालक यांचे विशेष लक्ष असून मदतीचाही हात देत आहेत. जरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा आणि खेळासाठी एक स्वतंत्र ॲकाडमी सुरू करणार आहे.

गोंविद कदम मुख्याध्यापक, बीड जि.प.शाळा ,जरेवाडी

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply