डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यातील टुमदार बांगर्डे गाव. सर्वांचा शेतीव्यवसाय. उसतोड मजुरांचे गाव अशीही ओळख. मात्र या गावची मुख्य ओळख म्हणजे गावात असेलेली जिल्हा परिषदेती प्राथमिक शाळा.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना १९४७ साली सुरु झाली. मोजकीच पटसंख्या असल्याने सुरुवातीला शाळा एकाच खोलीत भरायची. १९७३ साली शाळेच्या तीन खोल्यांचे बांधकाम झाले. आज मात्र शाळेमध्ये पहिली ते आठवीचे वर्गासाठी सात खोल्या असून एक ऑफीस आहे. शाळेची पटसंख्या १४० च्या पुढे आहे. ७ शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानात मागे राहू नये म्हणून अध्यापनात संगणकाचा वापर सुरु करण्यात आला. मूळ बांगर्डे येथील मात्र नोकरीनिमित्त पुण्यात असणारे भरत अंबादास कंद यांनी शाळेला पाच संगणक संच भेट दिले. लोकसहभागातून इनव्हर्टर मिळाले. खासदार दिलीप गांधी यांनी शाळेला प्रोजेक्टर दिला. या सर्व साधनांचा अध्यापनात वापर होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढली. शाळा आकर्षक दिसावी म्हणून रंगकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. भिंतीवर नेत्रसुखद, अभ्यासपूरक, विद्यार्थ्यांचा ज्ञानात भर टाकणारी, प्रेरणादायी चित्रे काढण्यात आली. बोलक्या भिंतीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.
या कामासाठी ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची मदत गोळा केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ लागले. या स्नेहसंमेलानाच्या माध्यमातून गेल्या वर्षी १ लाख रुपयांचा निधी गोळा झाला. विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करत ग्रामस्थांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप व पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा झिटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमातून उपलब्ध झालेल्या निधितून परिपाठासाठी छत आणि परिसरात ब्लॉक बसविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी स्टेजची आवश्यकता होती. दुपारच्या वेळी जेवणासाठी चांगली जागा असावी यासाठी पार बांधण्यात आला.
या कामासाठी तब्बल ७५ हजार रुपयांचा खर्च आला. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून बांगर्डे पॅटर्न परिसरात नावाजला गेला. गाव व परिसर हिरवाईने नटावा यासाठी एक मूल एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाठी शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमात शाळा कायमच अग्रेसर आहे. शिष्यवृत्ती, नवोदय परिक्षा, विशेष कृती कार्यक्रम, इंग्रजी स्पेलिंग पाठांतर, खेळाचा सराव असे विविध उपक्रम राबविले जातात.
शाळेच्या या वाटचालीमध्ये तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामंपचायत सदस्य अशा सर्वांचे योगदान लाभत आहे. भरत कंद, संजय हनुमंत शेळके यांनीही मोलाचे योगदान दिले. संजय बाजीराव शेळके, बाबासाहेब गायकवाड, मंदाताई जाधव, सरपंच अशोक शेळके यांचेही योगदान लाभले. शाळेच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप, उपसभापती प्रतिभा झिटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. संपत देशमुख, विठ्ठल क्षीरसागर, ज्ञानदेव तरटे, राहुलकुमार शर्मा, अनिलकुमार ढवळे, योगेश शिंदे, अशोक गायकवाड, सुनिता भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शब्दांकन: नंदकुमार बगाडे, प्रतिनिधी, श्रीगोंदा एक्सप्रेस. संतोष गोरखे
बांगर्डे शाळेचा मुख्याधयापक म्हणून मे २०१८ मध्ये रूजू झालो आहे. शाळेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासाठी प्रयत्न केला. याशिवाय इतर विविध उपक्रम प्राध्यान्याने राबविले गेले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यापेक्षा बदल दिसून आला. शाळेच्या विकासामध्ये ग्रामस्थांचे भरीव असे योगदान आहे. सिताराम भुजबळ, मुख्याध्यापक
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
