दिनांक ३ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील रहिवासी व सध्या पुण्यात TV9 या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवार दिनांक ०२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता कोरोना प्रादुर्भावामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.
पत्रकार रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अहमदनगरसह पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असतनाच, आरोग्यसेवा वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारमधील बेजबाबदार मंत्र्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, पांडुरंग रायकर यांचा कोरोना प्रादुर्भावामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने, राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांस तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, श्रीगोंदा तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये पत्रकारांसाठी आरक्षित बेड असावेत. या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी भोसले व पोलीस निरीक्षक जाधव यांना तालुक्यातील पत्रकारांमार्फत आज देण्यात आले.
यावेळी दत्तात्रय पाचपुते (जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ), अंकुश शिंदे (तालुकाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ), सोहेल शेख (तालुकाध्यक्ष, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ), उत्तम राऊत, पीटर रणसिंग, सुभाष शिंदे, दादा सोनवणे, शिवाजी साळुंके, राजेंद्र राऊत, अंकुश तुपे, राजू शेख, योगेश चंदन, विजय उंडे, चंदन घोडके, प्रमोद आहेर आदी पत्रकार उपस्थित होते.
स्रोत:(स्थानिक प्रशासनास दिलेले निवेदन)
