दिनांक २९ मे २०२४,श्रीगोंदा:
तालुक्यातील शेडगाव येथील सरपंच विजयराव शेंडे यांनी त्याच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या आमूलाग्र कामकाजाचे फलित म्हणून, त्यांना इंडियन पिनाकल नॅशनल अवॉर्ड सन २०२४ चा वृक्षमित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने तालुक्यातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सरपंच विजयराव शेंडे यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात आमूलाग्र निर्णय घेत गावामध्ये विकासाची गंगा नांदवली असल्याने त्यांचा कार्यकाळ कायम स्मरणात राहील असे कामकाज त्यानीं केले आहे. ते सन २०१५ सरपंच झाले त्यावेळी त्यांना सामजिक जाण असल्यामुळे त्यांनी राजकरण न करता समाजाच्या उपयोगासाठी व पर्यावरणासाठी पूरक उपक्रम हाती घेत सामजिक वनीकरण बिहार पॅटर्न या सारख्या उपक्रमातून गावात २ हजार झाडे लावली.
तंटामुक्ती अभियानातूनही मोलाचे कार्य केले.. महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून दरवर्षी एक हजार अशी ५ वर्षात ५ हजार झाडे लावली. गावातली लोक सहभागतून शेतकऱ्यांच्या बांधावर २ हजार फळांची झाडे लावल्याने गावकरी त्या फळाचा गोडवा अनुभवत आहेत.
त्यांनी शेडगाव येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. गावातून टाकळी कडेवळी गावाकडील अथवा शेडगाव शिव ते शेडगाव फाटा जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन केले. त्यांनी हाती घेतलेल्या गावच्या विकास कामांची व समाज उपयोगी उपक्रमांची पावती म्हणूनच त्यांच्या धर्मपत्नी सरपंच संध्या विजय शेंडे यांना पुन्हा सरपंच पदाची संधी मिळाली.
मा.सरपंच विजय शेंडे यांनी वृक्ष रोपण करुन गावाचे नाव तालुक्यात नाही राज्याच्या बाहेर नेले असून, त्याच्या या कामाची दखल घेऊन इंडियन पिनाकल नॅशनल अवार्ड २०२४ वृक्षमित्र हा पुरस्कार गोवा, पणजी येथे पद्मभूषण उमाशंकर पांडे, गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवळकर, सिनेअभिनेत्री आशु सुरपुर यांच्या हस्ते देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय स्तरातून विजय शेंडे यांचे कौतुक होत यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
