दिनांक २७ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांची एक ऑडिओ क्लिप तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांना फोन करून आशीर्वाद घेतला. या संभाषणाची क्लिप सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.

विक्रम पाचपुते यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मागासवर्गीय, नवबौद्ध समाज घटकांचा आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शाहू-फुले-आंबेडकरी विचारसरणीला मानणाऱ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पाचपुते यांना सक्रिय पाठिंबा दिला.

भीमा कोरेगाव घटनेतील वादग्रस्त भूमिका असलेल्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचे नाव सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये घेतले जाते. अशा पार्श्वभूमीवर विक्रम पाचपुते यांनी भिडे गुरुजींशी संपर्क साधला, यातुन विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये, विक्रम पाचपुते भिडे गुरुजींना आशीर्वाद मागताना ऐकायला मिळतात. या वेळी भिडे गुरुजींनी पाचपुते यांच्या विजयाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही दिल्या.

पुरोगामी कार्यकर्ते आणि कायदे अभ्यासकांद्वारे यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुनील ओहोळ आणि ॲड. संभाजी बोरूडे यांसारख्या व्यक्तींच्या मते, पाचपुते यांचे भिडे गुरुजींशी असलेले संवाद हे त्यांची राजकीय रणनीती आणि पुरोगामी कार्यकर्ते व विचारधारा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
स्रोत: ऑडिओ क्लिप.
