दिनांक २एप्रिल २०२५, श्रीगोंदा/शिरूर:
शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून नगर जिल्ह्यातील साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी घेण्याच्या निर्णयाला धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शासनाने ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकऱ्यांनी दिला आहे.

या धरणाचा ७ टीएमसी पाणीसाठा आधीच शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांच्या सिंचन व पिण्याच्या गरजांसाठी वापरला जातो. साकळाई योजनेसाठी २ टीएमसी पाणी लागणार असून, त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे शासनाने सदर योजना रद्द करून, कुकडी कालव्यातून विसापूर धरणात पाणी सोडून त्याद्वारे योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाने जबरदस्तीने ही योजना लादल्यास शिरूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या आंदोलनास प्रवृत्त होतील, असा इशारा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)



Advertise..
