दिनांक ४ एप्रिल २०२५, आष्टी (पत्रकार समाधान महाराज नाडकर):
“वाघ्या मुरळी ही केवळ परंपरा नव्हे, ती समाजप्रबोधनाची ताकद आहे. या लोककलावंतांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. संघटनात्मक पातळीवर कायदेशीर मार्गाने लढा देऊ,” असे जाहीर विधान वाघे मुरळी परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शाहीर साळुंके यांनी केले. संत वाघे दगडूभाऊ मेटे महाराज यांच्या समाधीस्थळ वाहिरा येथे आयोजित परिषदेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

या परिषदेस महाराष्ट्रभरातून वाघे मुरळी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंचावर बीड जिल्हाध्यक्ष कांबळे सर, लहू कोकाटे, सीताराम खराडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई गायकवाड, तुकाराम आंधळे, महादेव सानप, लहू ढेरे, संजय कुटे, भाऊ सावंत, भरत गोरे, दीपक वाघे, महादेव भांड, नवनाथ पांडुळे, संपत कावळे, चंद्रकांत बोरुडे, अशोक वाघे, खंडू वाघे, पंडित वाघे, दादा सावंत, सुनील काटे, अनिल काटे, विजय महाराज घोंगडे, पत्रकार समाधान महाराज नाडकर आदींची उपस्थिती होती.

“जागरण गोंधळ लोककलेची अधोगती नव्हे, तर सामाजिक आरसा आहे”
साळुंके यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, काळाच्या ओघात जागरण गोंधळाचे स्वरूप बदलत असले, तरी त्यामागचा हेतू – समाजप्रबोधन – अजूनही टिकून आहे. त्यांनी लोककलेचा तमाशाकडे झुकणारा कल चिंतेचा असल्याचे सांगत, आपण या बदलाकडे सजगपणे पाहण्याची गरज व्यक्त केली.

कलावंत एकवटले तरच समस्या सुटतील – झराड
तालुकाध्यक्ष झराड यांनी, “कलावंताचा ना धर्म असतो, ना जात. तो केवळ कलाकार असतो,” असे सांगत सर्व वाघे मुरळींनी भाऊभाऊ म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले. रात्रभर जागरण गोंधळ केल्यानंतर दिवसा वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांवर प्रकाश टाकत त्यांनी कलाकारांसाठी अपघाती विमा सुरू करण्याच्या प्रस्तावाची माहिती दिली.
परिषदेची सांगता ह.भ.प. सोमनाथ महाराज मेटे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
स्रोत:(प्रतिनिधी समाधान महाराज नाडकर)


Advertise..
