श्रीगोंदा, दिनांक ४ एप्रिल २०२५:
चांडगाव गावचे सुपुत्र आणि सध्या व्यवसायासाठी मुंबईत वास्तव्यास असलेले सुनील रामदास शिंदे (वय ४५) यांचे गुरुवार, दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.

मुंबईहून आपल्या मूळगावी चांडगावकडे येत असताना, रस्त्यामध्येच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अतिशय धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात त्यांच्या जिवाला घात झाला. प्रवासातच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता चांडगावमध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी परिसरातील ग्रामस्थ, आप्तस्वकीय, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सुनील शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड अचानक हरवल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. एवढ्या तरुण वयात त्यांचे जाणे हे अत्यंत दुःखद आणि ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून न भरून येणारी पोकळी आहे.
स्रोत:(प्रतिनिधी.. पत्रकार संभाजी घोडके)


Advertise..
