श्रीगोंदा, दिनांक ४ एप्रिल २०२५:
निमगाव खलू येथील पानंद रस्त्यावर मेसर्स दालमिया ग्रीन व्हिजन लिमिटेड या कंपनीचा तब्बल हजार कोटी रुपयांचा सिमेंट प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत सध्या प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागवल्या असून, हा प्रकल्प साकार झाला तर संपूर्ण परिसरातील शेती, आरोग्य व पर्यावरणावर भीषण परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सदर प्रकल्पामुळे निमगाव खलू, सांगवी दुमाला, आनंदवाडी, अजनूज, आर्वी, कौठा, गार, नगरपालिका दौंड, सोनवडी या परिसरातील गावांमध्ये गंभीर दुष्परिणाम होणार असल्याचा इशारा माजी सरपंच संदीप कलगुंडे यांनी दिला आहे. या प्रकल्पात वापरले जाणारे फ्लाय अॅश व पाँड अॅश हे वातावरणात मिसळून परिसरात प्रदूषणाचे जाळे पसरवतील, असा आरोप करत शेतपिके नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कांदा, कपाशी, भाजीपाला, तसेच ऊस पिकाचे उत्पादन घटण्याची भीती असून, या सर्व गोष्टींचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणार आहे. वृद्ध नागरिक, लहान मुले, तसेच पशुधनावरही याचे दुष्परिणाम जाणवतील. दुधाच्या उत्पादनावर देखील प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

संदीप कलगुंडे यांनी आपल्या निवेदनात सर्व सुजाण नागरिकांना आवाहन केले आहे की, आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. “आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून आपण सर्वांनी या प्रकल्पाच्या विरोधात आपला आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात चर्चा घडवून आणून सामूहिक हरकत नोंदवण्याचे नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

हा प्रकल्प केवळ विकासाचे खोटे चित्र रंगवत आहे, पण प्रत्यक्षात तो विनाशाची दिशा दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी, तरुण, महिला व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आवाज उठवणे ही काळाची गरज बनली आहे. असे मत मयुर शिंदे यांनी नोंदवले आहे.
स्रोत:(मयूर शिंदे)

Advertise..
