दिनांक ४ एप्रिल २०२५,अ.नगर (प्रतिनिधी):
वंचित बहुजन युवा आघाडीच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी ॲड. योगेश भगवानराव गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महासचिवपदी इंजिनिअर रोहन परदेशी यांची निवड करून नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

ही नियुक्ती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ऋतिक शिंदे, नबी अब्दुल सत्तार शेख, रोहिदास डोकडे, संघटकपदी अजित कदम, सहसंघटकपदी सुनील दामले, सचिवपदी ईश्वर कांबळे, सहसचिवपदी अजय भोसले, सदस्यपदी बाळू भोसले व सुनील फुलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲड. योगेश गुंजाळ हे गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून भटक्या-विमुक्त समाजात काम करत असून त्यांनी उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी आंदोलने, मोर्चे, उपोषण अशा माध्यमांतून लढा दिला आहे. भारतीय टायगर फोर्सच्या शहराध्यक्ष पदापासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासूनच त्यांनी पक्षात सक्रिय भूमिका बजावली आहे. आतापर्यंत कोणतीही अधिकृत जबाबदारी न घेतलेले ॲड. गुंजाळ यांच्यावर पक्षाच्या सामाजिक कार्याची दखल घेत युवकांना संघटित करण्याचे महत्त्वाचे काम सोपवण्यात आले आहे.

या नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी ॲड. गुंजाळ व संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
