दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा तालुक्यातील मौजे खेतमाळीसवाडी येथील गट क्रमांक ३१० मधील ७५ आर (R) जमिनीचे खरेदीखत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप अनिल रामा खेतमाळीस आणि सुनील रामा खेतमाळीस या दोन भावांनी केला आहे.
या बोगस खरेदीखतावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
अनिल आणि सुनील खेतमाळीस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जून २०२५ रोजी मौजे खेतमाळीसवाडी, ता. श्रीगोंदा येथील गट नं. ३१० मधील क्षेत्राचा खरेदी-विक्रीचा व्यवहार दस्त क्र. ४६६०/२०२५ अन्वये दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांच्या कार्यालयात रजिस्टर झाला. मात्र, हे खरेदीखत पूर्णतः बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे.
खरेदीखत लिहून देणारी व्यक्ती हयात नसताना आणि जिवंत नसतानाही हे खरेदीखत झाले आहे.

या व्यवहारात वापरलेले दस्तऐवज/कागदपत्रे (उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड) हे चुकीचे, खोटे, बनावट आणि बेकायदेशीर आहेत. तसेच, जामीनदारही बोगस असून त्यांचे कागदपत्रेही खोटे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सब रजिस्टर श्रीगोंदा यांनी ‘थम इम्प्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) बंद असल्याचे सांगून ही खरेदी दिली, असे त्यांचे म्हणणे आहे.
खेतमाळीस भावांना या बोगस खरेदीची माहिती सहा दिवसांत मिळाली. मूळ मालक म्हणून या ७५ आर क्षेत्रावर आपला ताबा असून, येथे घर, मुक्त गोठा, शेततळे आणि इतर शेतीची कामे वहीती असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रशासनाकडे तक्रार, पण गुन्हे दाखल नाही
या बोगस खरेदीखताबाबत अनिल आणि सुनील खेतमाळीस यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी, कर्जत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रार दिली आहे. मात्र, संबंधित आरोपींवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
“व्यक्ती हयात नसताना तो खरेदीखत कसे करून देऊ शकतो?” असा प्रश्न उपस्थित करत हे खरेदीखत बोगस असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
प्रशासनाला स्पष्ट इशारा देत त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती चौकशी करावी, तपास करावा व योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करणार आहोत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
