श्रीगोंदा: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अमोल झेंडे, पत्रकार हल्ला कृती समितीच्या तालुका समन्वयकपदी नितीन रोही यांची बिनविरोध निवड..


दिनांक २७ जुलै २०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी) –

श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणीसाठी मागील काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. पत्रकारांमध्ये नवीन नेतृत्वाबाबत उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या होत्या.

अखेर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी पुण्यनगरीचे पत्रकार अमोल झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पत्रकारांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या पत्रकार हल्ला कृती समितीच्या तालुका समन्वयकपदी नितीन रोही यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे, तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेची आखणी करण्यात आली होती.

प्रारंभी काही तांत्रिक अडचणीमुळे आणि चार इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीमुळे निवडणूक मतपद्धतीने घेण्यात येणार असल्याचे ठरले होते. मात्र, एकमत न झाल्याने आणि पत्रकार संघटनांमध्ये एकोपा राहावा या हेतूने चारही इच्छुकांनी माघार घेत अमोल झेंडे यांच्या नावावर सर्वसहमती झाली. जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे यांनीही यास मान्यता दिली आणि झेंडे यांची निवड जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली:

  • तालुकाध्यक्ष: अमोल झेंडे
  • पत्रकार हल्ला कृती समिती तालुका समन्वयक: नितीन रोही
  • जिल्हा उपाध्यक्ष: माधव बनसोडे
  • जिल्हा कार्यकारिणी सदस्य: राजेंद्र राऊत
  • सचिव: अनिल तुपे
  • शहराध्यक्ष: सोहेल शेख
  • सोशल मीडिया प्रमुख: शफीक हवालदार
  • उपाध्यक्ष: सचिन शिंदे, नंदकुमार कुरुंमकर
  • कार्याध्यक्ष: जावेद इनामदार
  • सल्लागार: श्रीरंग साळवे
  • खजिनदार: धनेश गुगळे
  • इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख: किशोर मचे

या वेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुश शिंदे, प्रमोद आहेर, शकीलभाई शेख, अमर घोडके यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ओहळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार दादासाहेब सोनवणे यांनी मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading