दिनांक २७ जुलै २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पेडगाव (जि. अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड या छत्रपती शंभूराजांच्या स्मृतीस्थळी महाराणी येसूबाई सरकार, म्हणजेच छत्रपती थोरले शाहूराजे महाराजांच्या राजमाता, यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी आणि अभिमानास्पद सोहळा रविवारी दिनांक २७ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी छत्रपती शंभूराजे यांच्या शौर्यस्थळावर महाराणी येसूबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, विधीवत पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे वंशज व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी महाराणी येसूबाईंच्या पराक्रम, राजनैतिक कौशल्य आणि त्यागमयी जीवनावर सखोल भाष्य करत उपस्थितांना ऐतिहासिक जाणिवेचा प्रत्यय दिला.

कार्यक्रमात “येसूबाई सरकारांचा विजय असो!”, “छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला धर्मवीरगड अमर राहो!” अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दणाणून गेले. उपस्थित मान्यवरांनी शौर्यस्थळाचा जतन व विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिव-शंभुभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते मा. संतोष इथापे, पत्रकार व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक चंदन घोडके, कुस्तीप्रेमी वस्ताद शांताराम रामचंद्र पोटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश मैंद, भागवत कळसकर, गडरक्षक मच्छिंद्र पंडित, तसेच पेडगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, सदस्य, शिक्षक, शालेय विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

किल्ले धर्मवीरगड समिती व उत्सव कमिटीच्या सहकार्याने साजरा झालेला हा जयंती महोत्सव म्हणजे इतिहासाच्या पुनःस्मरणाची आणि स्वाभिमान जागविण्याची प्रेरणादायी पर्वणी ठरली.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
