दिनांक २६ जुलै २०२५, श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यात मागासवर्गीय अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, या गंभीर प्रकरणांकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असून, विशेषतः श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप बहुजन समता पार्टीने केला आहे. त्यामुळेच दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या भारतीय स्वातंत्र्य दिनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेकडो समाज बांधवांसह आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंत सकट यांनी पत्रकारांना दिली.

सकट म्हणाले की, मागासवर्गीय अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी निरीक्षक शिंदे हे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करतात. काही घटनांमध्ये फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना “खोटा गुन्हा दाखल केल्यास तुमच्यावर कारवाई करू” असा धमकीवजा इशाराही दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असून, यामध्ये पोलिसांचा आरोपींना मदत करण्याचा स्पष्ट संकेत असल्याचे ते म्हणाले.

श्रीगोंदा तालुक्यातील एका मुलीच्या गायब होण्याच्या प्रकरणात अजूनही कोणताही ठोस तपास किंवा अटकेची कारवाई झालेली नाही. ही बाब पोलीस तपासाच्या संथ गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप, आरोपींना अटक करण्यात होत असलेला उशीर, तपासात टाळाटाळ, आणि यंत्रणेचा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार या सर्व बाबी असंतोष निर्माण करत आहेत, असे सकट यांनी नमूद केले.

आज श्रीगोंदा येथील बहुजन समता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत श्रीगोंदा तहसील कार्यालय व पोलीस यंत्रणेच्या कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे व नायब तहसीलदार मुद्गुल यांची बदली होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीस उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये बापूराव गायकवाड, आबा तोरडमल, ॲड. सुरेश शिंदे, ॲड. राहुल शिंदे, ॲड. प्रेरणा धेंडे, मीना शेंडगे, संतोष शिंदे, शिवाजी बुलाखे, किशोर काळे, दत्तात्रय शिंदे, पंकज शिंदे, मनोज घाडगे, बाळू आरणे, नानासो ससाने, बाबासाहेब ओहोळ, अमोल ससाने, मीनाक्षी सकट, मीराताई शिंदे, अश्विनी ससाने यांचा समावेश होता. या बैठकीचे अध्यक्षस्थान संपत कुचेकर महाराज यांनी भूषवले.

स्रोत:(मुलाखत)
