दिनांक १७ मार्च २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. यात्रेत फुलं, तोरण आणि खेळणी विकणारी खुशी अनिल भोसले (वय १७, रा. सिलगुंडी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) हिचा ऊन्हाच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे यात्रेत व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

खुशी ही आई-वडिलांच्या आधाराशिवाय लहानाची मोठी झाली. तिची आई दोन वर्षांपूर्वीच वारली होती, तर वडील व्यसनाधीन असल्याने तिला आधार नव्हता. त्यामुळे ती मामासोबत गावोगावी यात्रा फिरत उदरनिर्वाह करत होती. संत शेख महंमद बाबा यात्रेच्या निमित्ताने ती श्रीगोंद्यात आली होती. यात्रेच्या माध्यमातून फुलं आणि तोरण विकून ती आपले आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन मिळवत होती.

आज सकाळी ९:०० वाजता जेवण करून रोजच्या कामाला लागलेल्या खुशीला दुपारी १२:४० च्या सुमारास अचानक त्रास होऊ लागला. तिच्या नातेवाईकांनी तिची विचारपूस केली, परंतु काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळली. डॉक्टरांना बोलावण्यात आले, मात्र श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कोकरे यांनी तिला मृत घोषित केले.

खुशीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांसह यात्रेतील इतर व्यावसायिक हळहळ व्यक्त करत आहेत. ती तब्येतीच्या दृष्टीने कधीही त्रस्त नव्हती, मात्र तिच्या आईलाही अशाच प्रकारे अचानक मृत्यू आला होता, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात खुशीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येईल. या घटनेमुळे ऊन्हाच्या तीव्रतेचा प्रभाव आणि यात्रेतील व्यावसायिकांची परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
