दिनांक ६ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:
अहिल्यानगर शहरातील भिस्तबाग महाल परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे. केवळ १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका प्रौढ आरोपीने चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता, त्याने जामिनावर बाहेर असतानाच हा गंभीर गुन्हा केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या धाडसामुळे मुलगी बचावली..

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी घडली. आरोपी महेश भेटे हा पीडित मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करत असताना, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवली. शेजारी राहणाऱ्या सचिन लक्ष्मण पोटे यांना त्यांच्या घरामागील खोलीतून आरडाओरड ऐकू आली.

त्यांनी पाहिले असता महेश भेटे मुलीच्या अंगावर बसून तिच्यावर चाकूने वार करत होता. नागरिकांनी त्वरित धाव घेऊन दरवाजा लाथ मारून उघडला आणि हस्तक्षेप केला, ज्यामुळे मुलगी थोडक्यात बचावली.

रक्ताच्या थारोळ्यातून धावत बाहेर आलेल्या या ११ वीच्या विद्यार्थिनीच्या मागे आरोपी चाकू घेऊन धावत होता, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या भयावह प्रसंगाने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गंभीर जखमी अवस्थेतील मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर घटनेचा संपूर्ण तपशील समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
