दिनांक १२ डिसेंबर २०२४, इंदूर/श्रीगोंदा:
इंदूर शहरातील साखर व्यापाऱ्यांची तब्बल २ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने बुधवारी मोठी कारवाई करत प्रमुख आरोपी मितेश नाहटा याला अटक केली आहे. नाहटा हा महाराष्ट्रातील पुणे येथील मे.भुलेश्वरी शुगरचा मालक आहे. फसवणुकीचा आरोप असलेला त्याचा साथीदार साजन पाचपुते अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

अशी केली फसवणूक
मितेश नाहटा आणि त्याचा साथीदार साजन पाचपुते यांनी साखर व्यापाराच्या व्यवहारातून इंदूरमधील दर्शन इंटर प्राइज, राधा कृष्ण ट्रेडर्स, चंचल ट्रेडर्स, श्री कृष्णा ट्रेडर्स आणि पी. योगेश चंद्रा अँड कंपनी या कंपन्यांकडून साखर पुरवठ्याच्या बदल्यात २ कोटी ६१ लाख रुपये घेतले. मात्र, साखर न पाठवता रक्कम दिल्लीतील व्यावसायिकांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने मितेश नाहटा याला अटक करण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, मितेश मुंबईहून दिल्लीला विमानाने पळून गेला होता. गुन्हे शाखेची विशेष टीम दिल्लीला पोहोचली आणि नाहटा याला यशस्वीरित्या अटक करण्यात आली.

साजन पाचपुते अजूनही फरार
गुन्हे शाखेचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, “मितेश नाहटा याला अटक करण्यात यश आले असून त्याचा साथीदार साजन पाचपुते याचा शोध सुरू आहे. आरोपींच्या इतर साथीदारांचाही तपास सुरू आहे.”
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

