दिनांक १३ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
परभणी येथे घडलेल्या संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकाराने संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात झाला असून, याविरोधात ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अहमदनगर व श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संविधान हा देशाचा आत्मा असून त्याचा अपमान करणे सामाजिक शांतता व एकात्मतेला तडा देणारे असल्याचे पँथर सेनेने म्हटले आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाकडे पुढील ठोस मागण्या मांडल्या, त्यामध्ये म्हटले आहे की, विटंबनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत.

प्रशासनाने सुरू केलेले कोंबींग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, कारण त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून संविधानाच्या प्रतिष्ठेचे रक्षण होईल.
सदरील निषेध निवेदन श्रीगोंद्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना सादर केले. निवेदनाद्वारे त्यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी त्वरेने कारवाई करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी ऑल इंडिया पँथर सेना अ.नगर जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, तालुका अध्यक्ष संजय रणसिंग, तालुका उपाध्यक्ष पवन रणदिवे, युनिट ऑफ मूलनिवासी महाराष्ट्र राज्य संयोजक संजय सावंत, मुक्त पत्रकार चंदन घोडके, पत्रकार अमोल झेंडे, सत्यवान शिंदे, पत्रकार सचिन शिंदे, अंबादास घोडके, नितीन जावळे, महेश रणसिंग, ऋतिक रणसिंग, मंगेश घोडके, कालिदास सावंत, मोहन शिंदे, गणेश सावंत, रोहित सावंत आणि इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान व कायद्यावर पँथर सेनेचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अशा घटनांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

“संविधानाचा सन्मान, सामाजिक एकतेचे रक्षण” या उद्देशाने ऑल इंडिया पँथर सेना आणि सामाजिक कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
स्रोत:(निवेदन)
