दिनांक १४ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:
शहरातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत नूतन आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते रविवारी वृक्षारोपण करून पत्रकार गणेश कविटकर व त्यांच्या पत्नी प्रा. स्वाती कविटकर यांच्या कन्यारत्न शार्वीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आमदार पाचपुते यांनी कविटकर दांपत्याच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करताना मुलींच्या जन्माचे महत्त्व पटवून दिले.

गणेश व स्वाती कविटकर यांना तीन महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले असून, शार्वी हीचे श्रीगोंदा येथे प्रथमच आगमन झाले. तिच्या आगमनावेळी बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात आमदार विक्रम पाचपुते, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे, भाजप नेते दत्ता हिरणवाळे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आमदार पाचपुते यांनी शाळेच्या इमारतीच्या समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत पुढील मंत्रिमंडळ बैठकीत पालकमंत्र्यांच्या सहकार्याने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ५ लाख रुपयांची तरतूद आधीच केली असल्याचे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व पायाभूत सुविधांसाठी शासन स्तरावर ठोस प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

कविटकर दांपत्याने मुलगा-मुलगी समानतेचा संदेश देत मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपणाने करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाची प्रेरणा ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींच्या विचारांतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “शाळेतील विद्यार्थी हे झाडे लावून त्यांचे संगोपन करतील, त्यामुळे मुलांना पर्यावरण संवर्धनाचा आदर्श मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.

आमदार पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्याबाबत केलेल्या एका गंमतीशीर विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला. “श्रीगोंदा तालुक्याच्या अनाकलनीय राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळेच या ठिकाणचे वेगळेपण टिकून आहे. ही स्थिती बाहेरच्यांना समजली असती, तर चित्र खूप वेगळे असते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी कविटकर दांपत्य व आमदार विक्रम पाचपुते यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात लावलेली झाडे भविष्यात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
