साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे..जयंती निमित्त लेख..
आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा ९९ वा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा… अण्णाभाऊ साठे जयंती दीन हाच मराठी भाषा दिन !!
तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.
श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरशः मिळेल ते काम केले. कुठल्याही शाळेत न जाता ते स्वतःच्या क्षमतेवर शिकले. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. लहानपणी सांगली जिल्ह्यातील वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत आलेल्या अण्णांनी नंतर केवळ कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
अण्णाभाऊ यांचे बालपण-
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील १ ऑगस्ट १९२० वाटेगाव ता.वाळवा जि सांगली येथे त्यांचा जन्म झाला. वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हिंदू धर्माने काही जातींना गावाच्या बाहेर ठेवले होते. अशाच वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला. अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. अण्णांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते.
परिसरात कुठेही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगचे अन्नाभाऊच्या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष-बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले…
“तुमच्या मबईत जातीची शिवाशिव आहे का” ?? वडील म्हणाले, “व्हय…. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्या कपबशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आम्ही आपलं बाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्येंच्याकडं माळीकाम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन् आमी एका देशाचं असून आम्ही एकमेकाला शिवून घेत न्हाय.”
वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मुंबईत राहत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावे, असे त्यांना वाटे. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली.
गावाकडे आल्यावर एके दिवशी त्यांनी अण्णाला शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते. शाळेत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी गुरुजी त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाहीत. त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण गुरुजींनी त्याला मारायचे ठरवले होते. घोड्याएवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही, असे म्हणत मास्तरांनी अण्णांची उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, पकडा त्या तुक्याला. पण तोपर्यंत अण्णा घरी पोचले होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी गावातील पंतांकडे तक्रार केली. पंतांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हे देखील आले होते. पंतांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले…,
“गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही ?? गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वता:च्या पोराला एवढे मारले असते का ?? अण्णांचे मामा फकिरा म्हणाले… जर तुम्ही गावातील दुसऱ्या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते.” गुरुजी त्यावर काही बोलले नाहीत. तेव्हा फकिरा त्यांना म्हणाले, “गुरुजी इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका… पोराला नीट शिकवा. नायतर भलतंच व्हईल.” गुरुजी गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्याचा तुकाराम होईल आणि विमानातून इंग्लंड अमेरिकेला जाईल. तो शिकला पाहिजे.”
परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच अण्णाना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. अण्णाभाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र-मंडळी जमलेली असत.
आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या बहुजन समता पत्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.



