मका पिकावरील लष्करी अळी च्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाचा सर्जिकल स्ट्राइक हवा..
दिनांक १ऑगस्ट,श्रीगोंदा:
राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी ने थैमान घातले असून,या अळी चे पतंग प्रतिदिन १०० ते २०० किमी वेगाने प्रवास करून मका पिकाची नासधूस करत आहेत. त्यामुळे,मका पिकाच्या उत्पादनात मागील वर्षीप्रमाणेच मोठी घट येण्याची शक्यता आहे.म्हणून,शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, गावसभा घेऊन,या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक करायला हवा.असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे शास्त्रज्ञ डॉ.नंदकुमार भुते यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा व महामानव विचार प्रबोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.कृषी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन १९ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आले.या कार्यक्रमात बेलवंडी,हंगेवाडी,भानगाव, वांगदरी,कोळगाव,घोगरगाव,कोकणगाव,चांडगांव,पारगाव सु.,काष्टी,लोणी व्यंकनाथ,उक्कडगाव या गावांमध्ये कृषी विद्यापीठ चे शास्त्रज्ञ समवेत शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्रचे आयोजन करण्यात आले.
या कृषी सप्ताह चा समारोप दिनांक ३१ जुलै रोजी रत्नकमल मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे करण्यात आला.या कार्यक्रमास श्री भास्करराव लोंढे(कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे),श्री.अनिल गवळी(प्रकल्प उपसंचालक आत्मा अहमदनगर),श्री.दीपक पानपाटील(जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अहमदनगर),श्री.राजाराम गायकवाड (उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत),श्री.पद्मनाभ म्हस्के (तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा),ॲड.संभाजीराव बोरुडे,डॉ.नंदकुमार भुते (शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी),डॉ.विक्रम कड,श्री.संतोष करंजे(शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती),प्रा.श्री.निलेश बाबर,(कृषी तज्ञ) रमेश हिरवे तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात लिंबू प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर डॉ.विक्रम कड(शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)यांनी मार्गदर्शन केले.तसेच,कलम पद्धतीने भाजीपाला लागवड या विषयावर प्रा.संतोष करंजे(शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती)यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात श्री.भास्करराव लोंढे,श्री.अनिल गवळी,श्री.राजाराम गायकवाड,आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोदगे यांनी केले.तर,कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.संभाजीराव बोरुडे यांनी केले.याप्रसंगी,उपस्थितांचे आभार(तालुका कृषी अधिकारी) पद्मनाभ म्हस्के यांनी मानले.