शिवाजीराव नागवडे- सहकार कृतीतून जगलेले महर्षी..

दिनांक ८ सप्टेंबर,श्रीगोंदा :
महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी करून त्यावेळेस ज्यांनी मिशन समजून काम केले.त्यांच्याच संस्था आज जिवंत आहेत. अशा नेत्यांमध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे उर्फ बापू यांचे नाव आदराने घेतले जाते. मधल्या काळात अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखाने, सोसायटी, पतसंस्था निघाल्या.मिशन मध्ये कमिशन घुसल्याने,अवसायनात निघाल्या.विक्री झाल्याचे आपण पाहतो.पण,बापूंच्या प्रामाणिक हेतूंमुळे स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना व इतर संस्था आजही सुस्थितीत कार्यरत आहेत.हे अभिमानाची बाब आहे त्यांच्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतली गेली.विविध ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी दिली गेली.
बापूंनी घरची परिस्थिती लक्षात घेऊन,बारामती येथून शिक्षण अर्धवट सोडून,भविष्यातील शिक्षण, स्वप्न सोडून वांगदरीला आले.पण,कुटुंबा बरोबरच परिसर आणि तालुक्यातील शेती,विकास याचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता.मग,कम्युनिस्ट विचारसरणी कडे झुकले आणि घोड प्रकल्प, विशाल कुकडी,खाजगी डहाणूकर कारखान्याचा शेतकरी वर्गाला येणाऱ्या अडचणी,यात स्वतःला झोकून दिले.सहकारी तत्वावर ढोकराई माळरानावर तत्कालीन श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना उभा केला.५० वर्षे यात जीव ओतला. ७० च्या दशकात विधानसभा मतदार संघ आरक्षण होते.कारखाना आणि पाटपाणी साठी केलेल्या कामामुळे १९७८ मध्ये मतदार संघ खुला होताच,बापू आमदार झाले.बापूंच्या प्रामाणिक हेतूंमुळे बसस्थानक, आगार,कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी कामे झाले.१९८२ मध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,तसेच,तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या विविध पॉलिटेक्निक व इंजिनिअर कॉलेज ला परवानगी देण्याच्या निर्णयामुळे,बापुनी सर्वप्रथम बेलवंडी जवळ पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करून, शेतकरी वर्गाच्या ऊसाच्या गळपासाठी श्रीगोंदा कारखाना पाठोपाठ शेतकऱ्यांच्या मुलांसाठी इंदिरा गांधी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले.बापुनी कुकडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार नसतानाही पक्षाचे सरकार असल्याने,तत्कालीन मुख्यमंत्री व सहकारी शंकरराव कोल्हे हे मंत्री असताना,सतत प्रयत्न करीत विसापूर तलावात पाणी सोडणे असो की शेतीचे प्रश्न बापू नेहमीच अग्रेसर राहिले.बापुनां ७८ ते ८० काळचा आमदार कालावधी मिळाला.पण,काँग्रेसचे निष्ठावंत असल्याने,पक्षाने त्यांना ८५,९० मध्ये उमेदवारी दिली ९५ मध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते काँग्रेस मध्ये आल्याने,बापूंची उमेदवरी पाचपुते यांना दिली गेली.पुढे ९९ साली ज्येष्ठ नेते शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर, पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले.त्यावेळेस काँग्रेसने निष्ठावंत म्हणून बापुनां उमेदवारी दिली.अन बापू १९ वर्षनंतर आमदार झाले. ६५ वर्षाचा तरुण मंत्रालयात तरातरा चालू लागला. बापू या वयात काय काम करणार असा प्रचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.पाणी आवर्तन मिळण्याची शक्यता कमी दिसताच टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात ते डगमगले नाही.
सहकारात सहकारी मूल्य जपण्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.काही स्वकीय जरी ऍडव्हान्स मागायला आले आणि कारखाना अडचणीत असेल.तर,बापू कोणताही निर्णय बदलत नव्हते.कार्यकर्ते थोडा वेळ नाराज होत असे.पण,त्यांनाही नंतर बापूनी कारखाना टिकावा म्हणून मागणी मान्य केली नाही.हे पटायचे,त्यामुळे कारखाना निवडणुकीत विरोधकांचे कट्टर समर्थक देखील नेत्याचे प्रचार करायचे.पण मतदान बापूंच्या पॅनलला करून बापूंच्या कार्याची कदर करायचे.
एकदा शेतकऱ्यांना सहलीला नेण्यात आले.पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कारखाने पाहिले.एका कारखान्यात अधिकारी व संचालक मंडळाने श्रीगोंदयातील काही शेतकऱ्यांना विचारले,कोठून आलात व उद्देश काय? त्यावर ते म्हणाले श्रीगोंदा आणि तुमच्या कारखान्याची प्रगती झाली.त्याचे कारण शोधून श्रीगोंदयात प्रयोग करायचे आहे.त्यावर ती मंडळी म्हणाली, अहो आम्हीच आमच्या कारखान्यातील सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांचा आदर्श आणि सहकारातील बारकावे ,नागवडे यांच्याकडे जाऊन जाणून घेतले.त्यानुसार बदल केला आणि आमचा कारखाना सुधारला ते पाहण्यासाठी तुम्ही आलात? बापूंनी कारखाना,शैक्षणिक संस्था,ज्ञानदीप संस्था,सोनिया गांधी पॉलिटेक्निक माध्यमांतून हजारो विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी मोठे कार्य केले..

शब्द पाळणारे बापू

स्वर्गीय बापू तत्वनिष्ठ होते.शब्द विचारपूर्वक देत.दिलेल्या शब्दाला जागता येत नसेल तर,शब्द देत नसे. शब्द दिल्यावरही काम पूर्ण होईपर्यंत,कोणी मागे फ़िरलेलं त्यांना चालत नसे. २०१४ मध्ये स्वर्गीय कुंडलिक तात्यानां समर्थनाचा शब्द दिल्यावर,दोन्ही काँग्रेस वेगळ्या लढल्या.तरी बापूंनी दिलेला शब्द पाळला. निवडणूक लढविली नाही.अशा बापुनां राज्य साखर कारखान्याची शिखर संस्थेच्या म्हणजेच राज्य साखर संघाचे अध्यक्ष पद मिळाले.त्यातून,त्यांनी सरकार दरबारी साखर कारखान्यांना न्याय मिळवून दिला.
आशा रीतीने गांधीवादी, स्पष्ट वक्तेपणा, सहकारातून समृद्धी आणण्यासाठी सहकार मूल्याची जपणूक करणाऱ्या तालुक्यातील शैक्षणिक, आर्थिक, पाटपाणी,प्रशासकीय इमारती,दळण वळणं, रस्ते, विजकेंद्र, सहकारी संस्था जाळे, दूधसंघ,काँग्रेसची सेवा, कामगारांना वेतनश्रेणी आदी माध्यमातून मतदार संघ आणि सहकारातून राज्यातील कारखान्यांना न्याय असे कार्य करून,त्यांनी आपल्यातून निरोप घेतला.जाताना एकही आरोप नव्हता.अशा आदर्श आणि खऱ्या अर्थाने महर्षी असलेल्या बापूंना आदरांजली….
(संकलीत लेख)

Leave a Reply