गड-किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव व महाराष्ट्राची खरी दौलत:प्रा.कानिफनाथ उगले. चिखली येथे शिवव्याख्यान..
दिनांक ८ सप्टेंबर,चिखली,(श्रीगोंदा):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सह्याद्रीच्या दर्या-खोर्यांशी,डोंगरांशी जोडलेला आहे.या डोंगर रांगांतील किल्ले,त्यांचे देखणे रूप,मजबूत तटबंधी शिवकालीन इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात.स्वराज्याच्या रक्षणासाठी ह्याच गडकिल्यांवरती मावळ्यांनी आपले रक्त सांडले, त्यामुळे महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहे.तीच खरी आपली दौलत आहे.असे प्रतिपादन शिवचरीत्रकार प्रा.कानिफनाथ उगले यांनी केले.
गणेश उत्सवानिमित्त चिखली येथील छावा चिखलीचा गणेश उत्सव मंडळाच्यावतीने आयोजीत शिवव्याख्यानात ‘छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील गड-किल्ले’ या विषयावर प्रा.उगले बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बापूदादा गाडेकर होते.उगले पुढे म्हणाले की,गडकोट हे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष आहेत.परकीय आक्रमणांशी टक्कर देत असतांना गडकिल्यांचे बुरुज ढासळले.कारण,मावळ्यांनी शत्रुपुढे माना वाकवल्या नाहीत.तर,आपल्या छातीचा कोट केला, त्यामुळे इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले.ते या किल्ल्यांवरच. राज्याचा राकटपणा, कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रुपाने आजही टिकून आहेत. दुर्गवैभव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वारसांचा गाभा आहे. राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात ,राज्य संरंक्षणाच्या दृष्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे .म्हणूनच एक प्रकारे गडकोट राज्याचा खजिना होते,राजलक्ष्मी होते. प्राणा पलिकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र व वंदनीय आहेत.गड-किल्ल्यांचे जतन-संवर्धन-संरक्षण करणे गरजेचे असतांना .त्याच गडकिल्यांना भाडे तत्वावर देण्याचा सरकारचा निर्णय अतिशय दुर्देवी आहे.गडकिल्यांशी इथल्या मराठी माणसांचे भाविक नाते जोडले गेले आहे,तो विषय प्रत्येकाचा स्वाभिमान व अभिमानाचा असल्याचे मत प्रा.उगले यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी साकळाई उपसा योजनेचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे,(युवा नेते)गोरख बबन झेंडे, गोरख तुकाराम झेंडे,(ग्रामपंचायत सदस्य) फक्कड झरेकर,(ह.भ.प.) दत्तात्रय झेंडे महाराज आदी मान्यवर व ग्रामस्थ या व्याखानासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेजर संदीप दत्तात्रय झरेकर व (विचारधारा युवा मंच)चिखली यांनी प्रयत्न केले.