श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे गावाला कायमस्वरूपी पाण्याची योजना करावी, साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लागावी, जळालेल्या पिकाचे पंचनामे करून मोबदला मिळावा, कर्जमाफी व वीज बिल माफी व्हावी, गावांमध्ये रोजगार हमीचा हक्काचा रोजगार मिळावा. गावामध्ये तात्काळ पाण्याचे टँकर चालू करण्यात यावेत. बँक कर्ज उपलब्ध व्हावे, जनावरांना चारा छावणी पुनश्च चालू करावी, त्याचबरोबर पाणी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे,सम्पूर्ण गावास रेशन उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी दिनांक ९ सप्टेंबर २०१९ पासून,सकाळी १० वाजल्यापासून बांगर्डे गावातील सर्व ग्रामस्थ महिला,मुले,विद्यार्थी उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय आजदिनांक ७ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.यावेळी,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विक्रम शेळके (जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना) टिळक भोस (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) धनंजय शिंदे(उपसरपंच) मांडवगण, रवी लाटे(प्रदेशाध्यक्ष,युवक क्रांती दल), प्रा.योगेश मांडे, शिव व्याख्याते गणेश बेरड सह पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गाव बांगर्डे,येथील सर्व नागरिक दिनांक ९ सप्टेंबर पासून,आमरण उपोषणाला बसणार आहेत. या गावामध्ये भीषण पाणी टंचाई असून,मागच्या तीन वर्षांपासून मुबलक पाऊस झालेला नाही. त्यामुळे,संपूर्ण गावांमधल्या एकाही उद्भवला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. मागच्या तीन वर्षापासून शेतकऱ्याला एकही रुपयांचे शेती उत्पन्न या गावांमध्ये झालेले नाही.दुष्काळा मध्ये सरकारने जनावरांच्या छावण्या चालू केल्या होत्या. मात्र,त्या सध्या बंद आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारी घेऊन,पेरणी केलेली आहे. मात्र,पाण्या अभावी पिके जळाली आहेत.गावांमध्ये रोजगाराचं साधन राहिलेले नाही.महिला व तरुणी बाहेर गावी रोजगारासाठी जात आहेत.संपूर्ण गावावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जनावरांना खायला चारा नाही आणि पाणी सुद्धा नाही.अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगायचं कसं ? असा सवाल करत,संपूर्ण गाव लहान मुलांसह महिला वृद्ध तरुण संपूर्ण गाव महादेव मंदिर,बांगर्डे याठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे.
या उपोषणा दरम्यान गावातील शाळा पूर्णपणे बंद असतील.कोणतेही सरकारी कार्यालय गावांमध्ये चालू असणार नाही. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय पूर्णपणे बंद असतील. गावातील दैनंदिन व्यवहार बंद असतील.गावातला शेतमजूर सुद्धा शेतावर कामाला जाणार नाही.संपूर्ण गावच आमरण उपोषणाला बसणार आहे. गावाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार राजकीय पुढार्यांनी केल्याने. आम्ही सर्वच राजकीय पुढार्यांना गावबंदी करत आहोत.असा निर्णय या गावांमध्ये एकमताने झाला आहे. सरकारने लेखी आश्वासन न देता,आमच्या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण कराव्यात. अन्यथा,आम्ही संपूर्ण गाव आमरण उपोषण सोडणार नाही.असा निर्धार व्यक्त करत,या गावाने आमरण उपोषणाची ठोस भूमिका घेतलेली आहे.यावेळी, दत्ता खोटे, डॉ चंद्रकांत शेळके, ज्ञानदेव शेळके(मेजर), बापूसाहेब कंद, अशोक कंद, काका कंद, मा अनिल थोरात, मा अंबादास बनसोडे, मा दिलीप शेळके, मा देवराव शेळके, मा गणेश शेळके, मा सुभाष गायकवाड, अशोक शेळके, सुनील शेळके, दादाभाऊ शेळके, गणपत थोरात, नंदू शेळके, बुद्धांन पठाण, सागर शेळके, दत्तू शेळके, दिलीप तोंडे, दीपक शेळके, नामदेव शेळके, देवराव जाधव, नारायण शेळके, राजू शेळके यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
बांगर्डे गावाला न्याय न मिळाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार – टिळक भोस
श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या,बांगर्डे गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्न करणार असून,वेळ पडल्यास जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी माध्यमांना दिली आहे.