पोलीस अधिक्षकांना १५ दिवसात अहवाल सादर करण्यासंदर्भात “राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या” सूचना..
हेरंब कुलकर्णीनीं आदिवासी बालकाच्या खुन प्रकरणी आयोगाकडे केली होती तक्रार…

दिनांक १८ सप्टेंबर, भानगाव,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात दिनांक ५ सप्टेंबर रोजी भानगाव येथील आदिवासी पारधी जमातीतील दोन वर्षाच्या लहान मुलाचा,जमिनीच्या वादातून,डोक्यात वार करीत खून करण्याचा क्रूर प्रकार घडला होता.याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी “राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे” तक्रार केली होती.त्यानुसार, बाल आयोगाने अहमदनगर पोलीस अधिक्षकांना १५ दिवसात नमूद तक्रारीबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,हेरंब कुलकर्णी यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल तक्रार केली होती. पोलिसांनी आरोपी अटक केले. परंतु, पोलीस उपाधीक्षक यांनी आरोपींचा जबाब घेतला.त्यात त्यांचा मुलाला मारण्याचा हेतू नव्हता.परंतु, मुलाच्या वडिलांना मारतांना त्या लहान मुलाला लागले. असा तपशील पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत नमूद केला. मुळात आरोपी बचावात्मक भूमिकेत असेच बोलणार.मात्र, पोलिसांनी हे पत्रकारांना सांगण्याचे कारण काय ? वास्तविक पहिल्या दिवसाच्या बातमीत ‘यांची पुढची पिढी संपवून टाकू ‘ असे बोलून मुलाला मारले असे लिहिलेले आहे.हीच जर,तपासाची दिशा राहणार असेल.तर,तो खून न ठरता.अपघात ठरु शकतो ज्याचे पर्यवसान आरोपींना किरकोळ शिक्षा किंवा त्यांच्या निर्दोष मुक्ततेत होईल.
या अनुषंगाने,कुलकर्णी यांनी “राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे” पत्र लिहून,लक्ष घालण्याची विनंती केली होती.त्यावर आयोगाने कार्यवाही करीत पोलीस उपअधीक्षक यांनी आरोपींच्याबाबत असे सौम्य वाक्य का वापरले? याबाबत त्यांना विचारणा करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.शिवाय १५ दिवसात संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
