“२२६ श्रीगोंदा विधानसभा” निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू.

दिनांक २२ सप्टेंबर,श्रीगोंदा:
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.२१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी होईल.
या निवडणुकांसाठीची अधिसूचना २७ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी जारी केली जाईल.नामनिर्देशनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक ४ ऑक्टोबर (शुक्रवार) हा आहे.दिनांक ५ ऑक्टोबर रोजी छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ ऑक्टोबर(सोमवार) आहे. दिनांक २१ ऑक्टोबर (सोमवार) रोजी मतदान होणार असून,२४ ऑक्टोबरला (गुरुवार) मतमोजणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची कार्यवाही तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात होणार आहे.तसेच, मतमोजणी शासकीय धान्य गोदाम श्रीगोंदा येथे होणार आहे.२२६- श्रीगोंदा मतदारसंघ अराखीव आहे.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांमार्फत केल्या जाणार्या इलेक्ट्रॅानिक जाहिराती, सोशल मीडियावरील जाहिराती आणि बल्क एसेमेस यांचे प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक राहणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख एवढी खर्च मर्यादा आयोगाने ठरवून दिली असून,खर्च संनियंत्रणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अवैध मार्गाने होणार्या खर्चाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेचे सनियंत्रण करण्यासाठी विधानसभा तीन व्हीडिओ निरीक्षण पथक आणि खर्च ,आचारसंहितेचे विश्लेषण करण्यासाठी तीन व्हीडिओ व्हिवींग पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय ३ भरारी पथके श्रीगोंदा मतदार संघात कार्यरत असतील.
अशी माहिती श्रीगोंदा मतदार संघासाठी(निवडणूक निर्णय अधिकारी)अजय मोरे व(सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी)महेंद्र माळी,तहसीलदार श्रीगोंदा यांनी दिली आहे.

