केडगाव येथे महामार्ग पोलीस केंद्रात कार्यरत असणारे, मूळचे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील(पोलीस नाईक) शहाजी भाऊराव हजारे(वय४७) यांचे दिनांक १७ रोजी सकाळी साडे-सात वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी जात असतांना सोलापूरकडुन नगरच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या कंटेनर(क्र. RJ-14 GH-7055) ने धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यू झाला आहे.सदर अपघात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परीसरात नगर सोलापूर रस्त्यावर देवनारायन ढाब्यासमोर झाला.
श्रीगोंदा पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अपघात करून पळून चाललेल्या कंटेनर चालकाला त्याच्या मोबाईल लोकेशनवरून बाभळेश्वर येथून महामार्ग पोलिसांच्या मदतीने कंटेनरसह ताब्यात घेतले आहे.अपघाताबाबत (पो.कॉ.)शेख अब्दुल रहीम हुसेनमियाँ यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १७ रोजी सकाळी साडे-सात वाजता वरिष्ठांच्या आदेशानुसार (पो.ना.चालक)शहाजी हजारे हे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांसह मोबाईल पेट्रोलिंग करिता शासकीय वाहनाने नगर सोलापूर रस्त्याने जात असतांना,श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शिवारातील देवणारायन ढाब्यासमोर शासकीय वाहन थांबवत खाली उतरून लघुशंकेसाठी जात असतांना, नगर-सोलापूर रस्त्यावर,सोलापूर कडून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेंनरने हजारे यांना जोराची धडक दिली.त्यात हजारे गंभीर जखमी झाले.त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना नगर येथे उपचारासाठी आणले.मात्र,उपचारादरम्यान हजारे यांचा मृत्यू झाला.अपघात झाल्यावर कंटेनर चालक घटनास्थळा वरून पळून गेला होता. परंतु ,पोलीस पथकातील एका कर्मचाऱ्याने सदर कंटेंनरचा क्रमांक लिहून घेतला होता.
दरम्यान या कंटेनरचा शोध घेणे मुश्किल होते.परंतु,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे(पो.कॉ.)प्रकाश दंदाडे व साठे यांनी अपघात ग्रस्त भागात चौकशी करून,या कंटेनर चालकाचा मोबाईल क्रमांक मिळवला.त्या मोबाईलच्या लोकेशनवरून कंटेनर व चालकाला बाभळेश्वर येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हजारे यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या परिवारासह सहकारी पोलिसांत शोककळा पसरली आहे.