६ डिसेंबर…डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लेख:

प्रस्तुत लेखातून बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या ६ दिवसांत काय काय झालं ?हे पाहू,ज्या वरून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटेल.
१४ ऑक्टोबर,१९५६ रोजी नागपूर येथील दीक्षा भूमीवर लाखो अनुयायां सकट बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी,बाबासाहेबांना नागपूर महापालिकेकडून मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी त्यांनी नेहरूंच्या घातकी साम्यवादावर आणि सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयीकरणाला असलेल्या भारताच्या पाठिंब्यावर कडाडून टीका केली.यानंतर लगेच बाबासाहेब १६ तारखेला धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास चांदा शहरात गेले. परंतु,अतिशय थकवा आल्यामुळे चांद्याला काहीही भाषण न करता ते १८ तारखेला पुन्हा नागपूरला आले,आणि लगेच विमानाने माईसाहेब आंबेडकर आणि नानकचंद रत्तू यांच्या समवेत दिल्लीला रवाना झाले.
दिल्लीत गेल्यावर आराम करतील तर ते बाबासाहेब कसले? १९५६ हे वर्ष बौद्ध धम्माच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे होते. कारण भगवान बुद्ध यांच्या जन्माला २५०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे युनेस्कोने संपूर्ण जगात साजरे करायचे ठरवले होते. याचाच भाग म्हणून नेपाळ इथे आंतरराष्ट्रीय ४ थी बौद्ध धर्म परिषद भरवली जाणार होती.अर्थातच त्यांना या परिषदेचं आमंत्रण मिळालं. त्यांनी ते स्वीकारलं. २० नोव्हेंबर १९५६ ला त्यांनी या परिषदेत जगविख्यात असे कार्ल मार्क्स आणि बुद्ध यावर भाषण केले.ज्यात कार्ल मार्क्स कम्युनिझम अमलात आणण्याकरिता हिंसेला आणि कामगारांच्या हुकूमशाहीला प्राधान्य देतो. म्हणून बौद्धांनी कार्ल मार्क्स पासून दूरच राहावे हे स्पष्ट सांगितले.
अशा प्रकारे नेपाळ गाजवून बाबासाहेब वाराणसी मार्गे मुक्काम करत दिल्लीत आले.दिल्लीच्या निवास स्थानी १ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी दिल्लीत बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाज सेवक सोहनलाल शास्त्री यांच्यासमवेत भेट दिली. यानंतर देखील बाबासाहेबांचे दिनक्रम भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता.ज्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा दिल्लीतील सत्कार सोहळा.या कार्यक्रमस्थळी बाबासाहेब अनेक वेळ लोकांशी धर्मावर चर्चा करीत बसले होते.परंतु, त्याच रात्री त्यांनी त्यांचे सहाय्यक रत्तू यांना ते लिहीत असलेल्या ग्रंथांबद्दल काळजीने विचारले की, “हे ग्रंथ त्यांच्या जिवंतपणीच प्रकाशित होतील का?” कदाचित भयंकर दगदगीमुळे पुढे येणाऱ्या निर्वाणाची यांना पुसटशी कल्पना आली असावी.
३ डिसेंबर रोजी त्यांनी जे-जे लिहिलं होत ते सर्व टाईप करून घेऊन ते अचानकपणे त्यांच्या आजारी असलेल्या माळ्याला पाहायला त्याच्या खोलीत गेले. बाबासाहेबांना पाहुण तो माळीच ओक्सबोक्शी रडू लागला. आज देव माझ्या घरी स्वतःहून आला असे म्हणू लागला.त्याला समजावताना बाबासाहेब म्हणू लागले रडू नको मलाही आज ना उद्या जावेच लागणार आहे.मरण कोणालाही चुकणार नाही. –वास्तविक बाबासाहेब असे कधीही बोलत नसत. परंतु,त्यांची ही वाक्यं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
४ डिसेंबरला बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक मजकूर आणि लेखांवर सह्या केल्या.शिवाय,त्यांनी आचार्य अत्रे आणि एस.एम.जोशी यांना पत्रे लिहिली. याशिवाय “रिपब्लिकन पक्षाचे ध्येये” हा १५ पानांचा लेख लिहिला.
५ डिसेंबर रोजी प्रकृती बर्यापैकी खालावली असूनही त्यांनी ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथाचा काही भाग लिहायला घेतला.परंतु,त्यांना ते जमेना.दिवसभर म्लान स्थितीत असलेल्या बाबासाहेबांना पाहण्यास रत्तू यांना बरे वाटले नाही.म्हणून,ते त्यांना रात्रीच्या जेवणाचा आग्रह करू लागले.त्यांनी आधी नकार दिला.परंतु रत्तू ऐकेना म्हणून,ते जेवणासाठी ड्रॉईंग रूम मधून जेवणाच्या हॉलमध्ये जायला निघाले.या ड्रॉईंग रूममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथ संपदा होती. सर्व जातीधर्माच्या ग्रंथांपासून कायदे,अर्थशात्र, समाजशास्त्र,तत्वशास्त्रातील महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते.बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने या संपदेकडे पहात, त्यातील काही ग्रंथ रत्तू यांच्या हातात दिले आणि ते जेवायच्या खोलीत बसले.त्या दिवशी बाबासाहेबांनी अगदी थोडंसच जेवण रत्तू यांच्या समाधानासाठी घेतले.ते पुन्हा आपल्या ग्रंथ संपत्तीजवळ बसले आणि उठताना कधी नव्हे ते “चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा !” हा दोहा मोठ्याने बोलू लागले. यानंतर बिछान्यात झोपल्यावरही त्यांनी बिछान्याजवळ असलेल्या टेबलावरील सर्व ग्रंथांना चाळून पहिले आणि आचार्य अत्रे आणि जोशी यांना लिहिलेली पत्रे पुन्हा वाचून ते झोपी गेले.अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात ५ डिसेंबर ला शेवटचा सूर्य आला.५ तारखेला बाबासाहेबांची प्रकृती व्यवस्थित नसतानाही ते पूर्ण दिवस आणि उशिरापर्यंत दुसऱ्या दिवशी, म्हणजे ६ डिसेंबरला पहाटे १२ वाजेपर्यंत जमेल तितकं लिखाण करत झोपी गेले… ते नं उठण्यासाठी…
हा महापंडित संपूर्ण आयुष्य दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून झटत राहिला…हा कधी ही दमला नाही.की थकला नाही…याने यांच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाकवले…यांच्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक देश जगात अनेक संकटांना तोंड देत ठाम उभा आहे.यांच्या घटनेवर आज एक देश अनेक धर्म, शेकडो जाती, हजारो भाषा आणि संस्कृती असूनही एकसंघ आहे.हजारो लोक आपला मृत्यू आपल्या परिवारजनांमध्ये होवो,नातेवाईक मुले यांच्या समोर होवो,अशी इच्छा बाळगतात.
बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असावी ?हे सांगू शकत नाही. पण,मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथांच्या संपत्तीला वारंवार प्रेमाने पाहिले. त्यांना उशाशी घेऊनच ते कायमचे शांत झाले.हे वीरमरणच होय! कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणतीही आस न ठेवता मृत्यूला सामोरं जाणं हे वीराचचं काम. ग्रंथ पाहून समाधानाने मृत्यूस सामोरे जाणारा मनुष्य जगात अजून कोणीही नाही.
बाबासाहेबांना “बहुजन समता पत्र” परिवाराकडून कोटी कोटी वंदन …
(संकलीत लेख)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading