नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण,4 तासांहून अधिक काळासाठी असेल छाया…
दिनांक १० जानेवारी,मुंबई:
सरत्या वर्षी सूर्यग्रहण अनुभवल्यानंतर आता नव्या वर्षात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण 10 जानेवारीला असेल आणि या ग्रहणाचा कालावधी आहे, 4 तासांचा. 2019 मध्ये 26 डिसेंबरला वर्षाच्या शेवटी सूर्यग्रहण पाहायला मिळालं होतं. भारतातल्या अनेक शहरांमधून हे सूर्यग्रहण पाहता आलं. तब्बल 58 वर्षांनंतर इतकं मोठं सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव अनेक खगोलप्रेमींनी घेतला. काही ठिकाणी हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसलं, त्यामुळे त्याला कंकणाकृती ग्रहण असंही म्हणण्यात आलं.
यावर्षी 6 ग्रहणं
10 जानेवारीला पौष पौर्णिमेला म्हणजेच येत्या शुक्रवारी चंद्रग्रहण आहे.
4 तास चालणारं हे ग्रहण रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. हा कालावधी एकूण 4 तास 5 मिनिटं इतका असणार आहे. याआधी 11 फ्रेब्रुवारी 2017 ला अशा प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं. 2020 या वर्षात एकूण 6 ग्रहणं असतील. यापैकी 4 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. तर 2020 या नवीन वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 21 जूनला असणार आहे.