दिनांक २३ मे,श्रीगोंदा :
कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने रोजचे जनजीवन विस्कळीत होऊन. दैनंदीन व्यवहार ठप्प झाले असून, सर्व व्यापरी व कामगार वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाउन काहीसे शिथील होत असताना, आदिवासी आणि भटके विमुक्त समाजातील लोकांच्या समस्यांमध्ये मात्र, वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन संविधान प्रचारक मोहीमे अंतर्गत त्यांना मदत करण्याचे काम श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रमोद काळे म्हणाले की, ज्याच्याकडे उपजीविकेचे कोणतेही शास्वत साधन नाही. अशा समुहांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासी आणि भटके विमुक्त समाजातील लोकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन संविधान प्रचारक मोहीमे अंतर्गत त्यांना मदत करण्याचे काम श्रीगोंदा तालुक्यात करण्यात येऊन सुमारे ११० वंचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटात विविध सामाजीक संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमांतून लोकशिक्षण प्रतिष्ठान मार्फत वंचित कुटुंबांना तात्पुरती मदत केली असली तरी,आता या बदललेल्या परिस्थितीत जुळवून जिवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी येणाऱ्या काळात महिला बचतगट,मायक्रो फायनान्स बचत गट, शेतकरी गट तसेच शासकीय योजनांची माहिती या लोकांपर्यंत पोहोचवून प्रशासनाच्या सहकाऱ्यातून स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
यावेळी संविधान प्रचारक मोहीमेतील सहयोगी लोकशिक्षण संस्थेचे सतिष ओहोळ, राजेंद्र राऊत, दिगंबर काळे, वंचित विकास संस्थेचे नरसिंग भोसले आदी उपस्थित होते.
