आज्जीच्या अंतिम संस्करातील राख झाडांच्या मुळाशी विसर्जित करून,समाजास वेगळा संदेश..
दिनांक १० जानेवारी,कोळगाव(श्रीगोंदा):
मृत व्यक्तीच्या शरीराला भडाग्नी देऊन,शिल्लक राहणारी रक्षा (राख) एखाद्या नदीत प्रवाहित केली जाते. एकीकडे रक्षा (राख) व अस्थी नदीच्या प्रवाहात विसर्जन करण्याच्या माध्यमातून जलप्रदूषणची समस्या गंभीर होत असताना. कोळगाव येथील प्रगतशील शेतकरी नितीन भास्करराव लगड यांनी या पारंपरिक प्रथेला बगल देत आपल्या १०६ वर्षी निधन पावलेल्या,यमुनाबाई बाबूराव लगड या आज्जीच्या मृत शरीराला भडाग्नी देऊन,शिल्लक राहणारी रक्षा (राख) नदीत प्रवाहित न करता आठवण डोळ्यासमोर कायम राहावी यासाठी सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी सावडण्याच्या कार्यक्रमानंतर आपल्या शेतामध्ये आंबा, चिकू, फणस, पेरू या सारख्या फळझाडांची लागवड पाहुण्यांच्या हस्ते करीत आज्जीच्या अंतिम संस्करानंतर राहिलेली राख झाडांच्या मुळाशी विसर्जित करून,समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.
अश्या प्रकारे सर्वांनी उपक्रम राबविला तर,आपल्या आप्तेष्ट, नातेवाईकांच्या निधनानंतर त्यांच्या शरीराची रक्षा,अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याऐवजी वृक्ष लागवड केली.तर नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होईल. आपले मृत नातेवाईक झाडांच्या रूपाने आपल्या सानिध्यात कायम राहतील.असे प्रगतशील शेतकरी नितीन लगड यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमाबद्दल कोळगाव तसेच परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. यासाठी कोळगावचे माजी उपसरपंच मधुकर लगड, उपसरपंच नितीन नलगे यांच्यासह अनेक नातेवाईक व मित्रांनी मदत केली.