नामदेव ढसाळ स्मृती दिनानिमित्त..

मुंबईत एक कवी संमेलन भरलं होतं. भल्या भल्या मान्यवर कविंची पंगताच बसलेली. अध्यक्ष होते अनंत काणेकर. त्यात एका माणसाची चिट्ठी आली. एका टक्सी ड्रायव्हरला म्हणे या सर्वांत कविता म्हणायची आहे, सर्वांच्या भुवया उंचावल्या. तिथं कोणी संधी देईना. तो टक्सी ड्रायव्हर तरीही शांतपणे स्टेजवर चढला आणि त्यानं कविता वाचायला सुरुवात केली. प्रेक्षकवर्ग स्तंभित… काहीतरी प्रचंड आदळतय, पण त्याच्या झपाट्याने दिपून जावं तसं त्याच्या कवितेतलं सामर्थ्य होतं, वेगळेपण सगळ्या कवितांहून वेगळ असणं हे सर्वांनाच जाणवलं. प्रेक्षकांनी दुसरी कविता वाचायचा आग्रह धरला पण, या पठ्ठ्यानं वन्समोअरची संधी घेतली नाही. ‘माणसं न वाचताच’ हे लोक कविता करत आहेत, असं उपस्थित कवींना सुनावून आला… तो विजेच्या वेगान आला तसाच लुप्तही झाला!
या कवितेची भाषा मराठीला नवीन होती. त्याच्या कवितेचा आशय यापूर्वी कधी मराठी कवींच्या स्वप्नातही आला नव्हता. विजेसारखे तळपते शब्द आणि आजवरच्या अन्यायामुळे दबलेल्या रागाचा स्फोट आणि तरीही सगळ्यांना व्यापून असणारी काव्यमयता यामुळे ही कविता मराठीच्या दरबारात एक नवीन रत्न घेऊन आली हे नक्की. कवितेचा अलवार मुखडा… तिचं साजर-गोजर रूप त्यानं एका फटक्यात पुसून टाकल. तीक्ष्ण क्रूर न उमजणारे तरीही वार करून जाणारे शब्द…
आत्म्यानं गुंडाळलेली वस्त्रे फाडायला लावून कवितेला माणसाशी जोडणार हे नाव, मुंबईच्या फरास रोडवर वेदनेनं, पिळवणुकीनं भरलेल्या गोलपिठा मध्यमवर्गाची चामडी नेसून पोह्यातले शेंगदाणे शोधणार्‍या समोर नेणारे नाव, ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव’ असा सवाल करुन लोकशाहीचे सुक्त गाणाऱ्यांना घाम फोडणारे नाव आणि झालेच तर ‘लोकशाही मेली डेंगन्यापरी’ असे सांगत समाजवादाचा डांगोरा पिटणारे आणि याच वादासाठी लेखणी, वाणी आणि उर्जा खर्च करणारेही हेच नाव. ‘द पोएट ऑफ अंडरवर्ल्ड’ म्हणून नावाजलेलं नाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बोट धरून व्यवस्थेचा डोंगर हलवायला निघालेल्या आणि सूर्याच्या रथाचे सात घोडे मारायला निघालेल्या मराठी साहित्यातील महाविद्रोहाचे, महाप्रलयाचे आणि झालेच तर वर्ग व्यवस्थेला दात लावायला निघालेल्या एका पंथर चे नाव नामदेव साळूबाई ढसाळ!
गोलपिठा’ किंवा ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’ किंवा ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी’, या कवितासंग्रहातील कवितेत, किंबहुना सगळ्याच कवितेत त्याचा सर्वहारा वर्गात सर्व जातीजमाती, कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांना सामावून घेण्याचाच प्रयत्न आहे. त्याच्या एका लेखसंग्रहाचं नावही- ‘सर्व काही समष्टीसाठी’ असं आहे. त्यामुळे नेहमीच्या आपल्या पठडीतल्या अर्थानं नामदेव विशिष्ट जातीतल्या लोकांच्या शोषणाविषयी बोलतो असं म्हणता येत नाही. नामदेवला ‘दलित कवी’ म्हणणं ही आपल्याच समजुतीतली उणीव दाखवण्यासारखं आहे. त्याचं गद्यपद्य, वर्तमानपत्रांतील सदरलेखन आणि मुलाखती या सगळ्यांमधून त्याचा जातिअंतांचा लढा सर्वहारा वर्गाच्या लढयाशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहे.
निर्वाणा अगोदरची पीडा सहजपणे झेलून मरणाला धीरोदात्तपणे सामोर जाणारा नामदेव आणि त्याच्याप्रमाणेच मर्ढेकरोत्तर मराठी कवितेला वळण देणारे दि.पु. चित्रे , अरुण कोलटकर या तिन्ही कवींना कर्करोगालाच बळी पडावं लागणं हा विचित्र योगायोगच आहे. त्यांच्यासारखे कवी मरणानंतर अधिकच विद्रोही होत जातात हे मात्र खरं!
(संकलीत)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading