श्रीगोंद्यातील प्रमुख सरकारी कार्यालयात अधिकारी गायब.
घनःशाम शेलार यांच्या भेटीने गलथानपणा उघड..
दिनांक ४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी दिनांक ३ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे या कार्यालयातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमि अभिलेख व तहसील कार्यालयात फक्त शिपाई,क्लर्क असे मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.सर्व प्रमुख अधिकारी कार्यलयीन वेळेत अनुपस्थित होते.
सोमवार हा श्रीगोंद्याचा आठवडे बाजाराचा दिवस. तालुक्यातील विविध भागातून कामानिमित्त शेतकरी, विद्यार्थी व इतर लोक सरकारी कार्यालयात या दिवशी येत असतात.सरकारी अधिकारी कार्यालयात हजर नसतात अशा तक्रारी शेलार यांच्या कडे आल्यावर, शेलारांनी खातरजमा करण्यासाठी स्वतः शेलार सोबत युवक(तालुकाध्यक्ष)ॠषिकेश गायकवाड,(माजी उपनगराध्यक्ष)अख्तर शेख,(काॅग्रेसचे)प्रसाद काटे व इतर प्रमुख कार्यकर्त्यां समवेत सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली.तेथे एक शिपाई व लेखनिक हजर होते. उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता,शाखा अभियंता,कार्यालय अधीक्षक व इतर कर्मचा-यांनी दांडी मारल्याचे निदर्शनास आले. कार्यालयाबाहेर कामानिमित्त आलेल्यांची गर्दी होती.
नंतर सकाळी ११ वा. शेलारांनी तहसील कार्यालया कडे आपला मोर्चा वळवला.तेथेही अशीच अवस्था होती.शिपाई,क्लर्क हजर व तहसीलदारांसह अन्य अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते.कामानिमित्त आलेले लोक दीनवाना चेहरा करून साहेबांची वाट पाहत होते.शेलारांचे पथक नंतर भूमी अभिलेख कार्यालयात पोचले.तेथे शिपाई व मोजके एकदोन कर्मचारी हजर होते.उपअधीक्षक व अन्य कर्मचारी गैरहजर आढळले.कामासाठी वारंवार हेलपाटे मारणारे त्रस्त नागरिक कार्यालयाबाहेर साहेबांचा धावा करीत होते.साहेब मात्र “आऊट ऑफ कव्हरेज ” होते.
संतप्त झालेल्या शेलार यांनी तिन्ही कार्यालयांच्या वरिष्ठांना फोन करून कैफियत मांडली. यावेळी बोलताना शेलार म्हणाले ,” राज्य सरकार बदलले आहे ,याची जाणीव तालुक्यातील अधिकाऱ्यांना अजून दिसत नसावी.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जर सकाळी साडे सात वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत कामे करीत असतात.अनेक मंत्री सकाळी वेळेपूर्वी येऊन रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कार्यमग्न असतात. मग तालुक्याच्या अधिकाऱ्यांना विनाकाम पगार घेण्याचा व अनुपस्थित राहून हजर असल्याचे दाखविण्याचा परवाना कोणी दिला आहे ?
आपण या बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधून संबधितांवर कारवाईची मागणी करणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.मोहिते यांना आपण झाल्या प्रकारा बद्दल सांगितले.त्यांनी दखल घेऊ तसे आश्वासन दिले. तालुक्यातील सरकारी यंत्रणेला शिस्त लागे पर्यंत आपण याबाबत पाठपुरावा करीत राहू असे आश्वासन शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
भूमी अभिलेखच्या उप अधीक्षकांच्या खुर्चीला हार…
जनतेच्या सर्वाधिक तक्रारी भूमी अभिलेख कार्यालया बाबत होत्या. वरील तिन्ही ठिकाणी भेट दिल्याचा प्रसंग फेसबुकवर ‘लाइव्ह’ होता.नेटिझन्सनी त्यावर जबरदस्त प्रतिसाद दिला.भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांच्या खुर्चीला त्यांच्या अनुपस्थितीत हार घालण्यात आला.या गांधीगिरीची तालुक्यात खूप चर्चा झाली.