खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतमजूराने केले विष प्राशन: दुर्दैवाने मृत्यू.
दिनांक ८ फेब्रुवारी,श्रीगोंदा कारखाना,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू ओढवला आहे.
दत्ता गणपत सुतार(वय वर्षे ३५)रा.श्रीगोंदा फॅक्टरी हा तरुण श्रीगोंदा फॅक्टरी येथील शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून उपजीविका करत होता. काही खाजगी सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते.मोठ्या दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते वेळेवर फेडता येत नव्हते. सतत सावकार वसुलीसाठी दारात येऊन, मारहाणीची धमकी देत शिवीगाळ करत असत. या प्रकाराने काही दिवस तो तणावात होता.
यानंतर,सावकारांचा त्रास असह्य झाल्याने,त्याने बुधवार दि.५ रोजी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले असल्याची माहिती समजते आहे.कुटुंबियांनी तातडीन उपचारासाठीे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार चालू असतानाच शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.त्याच्या पाठीमागे पत्नी नऊ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सध्या खाजगी सावकारांचे पेव सुटले आहे. “गरजवंताला अक्कल नसते” असा काहीसा प्रकार सध्या मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये व श्रीगोंदा शहरात दिसून येत आहे.आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना हेरून,मध्यस्थमार्फत हे सावकार संपर्क साधतात.अडचण किती महत्त्वाची आहे.हे पाहून व्याजाचा दर ठरवला जातो.आठ दिवसांसाठी लागणाऱ्या पैशाला १० ते १५ टक्के व्याजदर ठरवला जातो.त्यामुळे वेळेवर पैसे न फेडल्यास अल्पावधीतच रक्कम दुप्पट तिप्पट होते. रकमेचा बोजा वाढल्याने सर्वसामान्यांना फेडणे मुश्किल होते.परिणामी मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते असलेले सावकार,पाशवी पध्दतीने वसुली करतात,प्रसंगी मारहाण,शिवीगाळ व मौल्यवान वस्तू घेऊन जातात. सहकार निबंधकांसह स्थानिक पोलीस प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालून,नमूद सावकारांचा बंदोबस्त केला नाही.तर,अनेक जणांचा बळी जाऊ शकतो.पीडित लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते आहे.