टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (वय ८२) हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टीव्ह झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम यावर ते सातत्याने आपल्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टी शेअर करत आहेत.
रतन टाटांनी नुकतीच फेसबुकवरून त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संगोपना संबंधित वैयक्तिक माहिती शेअर केली आहे. ‘ह्यूम्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. बुधवारी रात्री त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. टाटा लिहितात की, लॉस एंजेलिस (अमेरिका)मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरू केली.
आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजीने संस्कार धडे दिले…
रतन टाटा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, माझ्या आई-वडिलांनी (नवल व सोनी टाटा) घटस्फोट घेतला त्यावेळी मी अवघा दहा वर्षांचा होतो. त्यानंतर माझे पालनपोषण आजी नवजबाई टाटा हिने केले. आई-वडिल विभक्त झाल्यानंतर मला व माझ्या भावाला काही समस्या आल्या.परंतु,तरीही आमचे बालपण आनंदी गेले. दुसर्या महायुद्धानंतर आजीने आम्हा दोघा भावंडाना उन्हाळी सुट्टी व्यतीत करण्यासाठी लंडन नेले. तिथेच तिने आम्हाला जीवनातील मूल्यांचे महत्त्व सांगितले. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यावेळी आजीने स्पष्ट केले.
वडिलांशी वैचारिक मतभेद…
वडिल नवल टाटा यांच्याशी असणा-या वैचारिक मतभेदांबद्दल बोलताना रतन टाटा म्हणतात की, ‘मला व्हायोलिन शिकायचे होते आणि माझे वडील मला पियानो शिकण्यास आग्रही होते. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यास उत्सुक होतो. पण, मी शिक्षणासाठी लंडनला जावे असे वडिलांना वाटत होते. मला आर्किटेक्ट व्हायचे होते आणि ते अभियंता हो म्हणून मागे लागले होते.’
टाटा पुढे म्हणतात, अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकलो ते फक्त माझ्या आजीमुळेच,तिच्यामुळेच मी आर्किटेक्टमधून पदवी प्राप्त करू शकलो. पण, माझे वडील संतापले होते.मात्र, मी त्यांच्या संतापाकडे दुर्लक्ष केले आणि आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण करून लॉस एंजेलिस येथे कामास सुरुवात केली. तिथे मी दोन वर्षे काम केले. ते दिवस आठवताना रतन टाटा म्हणतात, ‘तो एक चांगला काळ होता. सगळच कसे सुंदर होते. माझ्याकडे स्वतःची चारचाकी गाडी होती. मी माझ्या कामाप्रती खूपच आनंदी होतो. मी ‘तिच्या’ प्रेमात पडलो.आमचे जवळपास लग्न होणारच होते.पण, १९६२ साली माझ्या आजीची प्रकृती बिघडली. त्यामुळे मला भारतात परतावे लागले.अन् माझ्या प्रेमकथेला मुर्त स्वरूप आलेच नाही.’
जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवसाच्या काही दिवस आधी उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असणा-या रतन टाटांनी आपली ‘अधुरी प्रेमकहाणी’ नेटक-यांसमोर मांडली आहे. मात्र, त्यांनी आपल्या त्यावेळच्या प्रेमिकेचे नाव गुलदस्त्यातच ठेवले आहे.