श्रीगोंदयात १४ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन.

दिनांक १४ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
आमदार बबनराव पाचपुते यांच्या संकल्पनेतून तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा व वाबळे इव्हेंट यांच्या माध्यमांतून श्रीगोंदा कृषी महोत्सवाची पर्वणी दिनांक १४ फेब्रुवारी पासून दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत बाह्यवळण रस्त्यालगत महात्मा फुले उद्यानासमोरील पटांगणामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
आ.बबनराव पाचपुते,(बाजार समितीचे उपाध्यक्ष) वैभव पाचपुते व वाबळे इव्हेंटचे संचालक बापूसाहेब वाबळे यांनी याविषयी अधिक माहिती दिली की,सदर प्रदर्शनामध्ये अनेक नामवंत कंपन्यांचे दीडशे पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात येणार असून,यामध्ये विशेष करून ट्रॅक्टर,हार्वेस्टिंग यंत्र,ब्लोअर मशीन,एसटीपी पंप,सेंद्रिय खते,औषधे,बी-बियाणे,यंत्रसामग्री, पॅकेजिंग,साठवणूक,पशुखाद्य व औषधे सिंचन विभाग,शासकीय विभाग,सौर ऊर्जा,कृषी पुस्तके, पाणी व्यवस्थापन,पोल्ट्री सोल्युशन,शेततळ्याविषयी माहिती व विविध शासकीय योजनांचे दालने तसेच गृहपयोगी वस्तू,खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी ऊस,डाळिंब,कांदा पिका बाबत चर्चासत्रांचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. प्रदर्शन कालावधीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक १ तासाला मोफत भव्य लकी ड्रॉ काढून,त्यांच्यासाठी शेती उपयोगी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहेत.
आमदार पाचपुते व आयोजकांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,दरवर्षी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची व खरेदी करण्याची संधी कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.लिंबू, भाजीपाला,डाळिंब,द्राक्षे,सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणाऱ्या व आधुनिक शेतीची कास धरणाऱ्या बळीराजाला ही सुवर्णसंधी मिळणार आहे.

