दिनांक २७ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:
घोड व भिमानदीच्या बागायत पट्ट्यातील निमगाव खलू येथे प्रस्तावित असलेल्या दालमिया सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात हरकती नोंदविण्यासाठी मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगवी फाटा येथील शांताई मंगल कार्यालयात जनहित सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी श्रीगोंदा, दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष शाहुराजे शिपलकर यांनी केले आहे.

आज, २७ एप्रिल रोजी, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी संस्थेच्या सभागृहात कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाचा संभाव्य धोका आणि त्याविरुद्ध उभे राहण्याची गरज यावर चर्चा करण्यात आली.

शेतकरी हिताला धोका ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे घोड व भिमानदी परिसरातील सुमारे १० किलोमीटर परिघातील शेती प्रभावित होणार असून, अनेक गावांतील कृषी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे काष्टी, निमगावखलू, सांगवी दुमाला, गार, कौठा, आर्वी, अनगरे, अजनुज, चिखलठाणवाडी, वेळू, मुंढेकरवाडी, कणसेवाडी, पेडगाव, म्हातारपिंप्री, मढेवडगाव, ढोकराई, चोरमलेवाडी, वांगदरी, ढोमाळवाडी, लिंपणगाव, जंगलेवाडी तसेच शिरूर तालुक्यातील इनामगाव, मांडवगण फराटा, भाबुळसर, तांदळी, गणेगाव, कळसकरवाडी, फराटेवाडी आणि दौंड तालुक्यातील दौंड नगरपरिषद क्षेत्र व ग्रामीण परिसर, नानविज, सोनवडी, काणगाव, नांदखिलेगार, बेटवाडी, नवीनगर, पाटस, बिरोबावाडी, गिरिम, गोपाळवाडी, लिंगाळी, खोरवडी, आलेगाव, देवळगाव राजे, वडगाव दरेकर, कदमवस्ती, फसणवाडी, माळवाडी, मंळद, बोरिबेल यांसह अनेक गावांचा समावेश होणार आहे.

या सिमेंट प्रकल्पामुळे निर्माण होणारे रासायनिक दुष्परिणाम व विषारी वायूंमुळे शेतजमिनी नापीक होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीने हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीस ॲड. विठ्ठलराव काकडे, राकेश पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, गणपतराव परकाळे, सुनिल दरेकर, ज्ञानदेव पाचपुते, जितेंद्र मगर, योगेश भोयटे, योगेश मगर, रमेश परकाळे, हौसराव खरात, अनिल मगर, शरद शेळके, माऊली खरात, विनायक मगर, श्रीकांत मगर, रफिक इनामदार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहकार महर्षी संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी सर्वांचे आभार मानले.
राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे..
या भागातील प्रत्येक शेतकरी हा विविध राजकीय नेत्यांचा आधारस्तंभ आहे. आज या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असताना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. अन्यथा भविष्यात शेतकरी मतदानाच्या माध्यमातून जाणीव करून देतील, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शाहुराजे शिपलकर यांनी दिला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
