छत्रपती महाविद्यालयाचा गौरव..! प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी आणि समन्वयक डॉ. विलास सुद्रिक यांची राज्यस्तरीय समित्यांवर नियुक्ती..

श्रीगोंदा, दि. २२ एप्रिल २०२५ —

श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “करिअर कट्टा” उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांची जिल्हा प्राचार्य प्रवर्तक तसेच राज्यस्तरीय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

हि निवड दिनांक २२ एप्रिल रोजी करिअर कट्टाचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. नितीन घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या निवडीनंतर महाविद्यालयाच्या कार्यक्षमतेची आणि गुणवत्तेची पुन्हा एकदा पावती मिळाली आहे.

त्याचबरोबर, महाविद्यालयाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. विलास सुद्रिक यांचीही कॉर्पोरेट व ओव्हरसीज प्लेसमेंट तसेच गर्जे मराठी ग्लोबल या राज्यस्तरीय समित्यांवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भातील अधिकृत निवडीचे पत्र नुकतेच महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयाच्या वतीने सन २०२४ मध्ये करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच महाविद्यालयाला विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन ही मानाची निवड करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लक्षात घेता विद्यार्थी केंद्रित उपक्रम, विविध कोर्सेस आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवून करिअर कट्टाची व्याप्ती अधिक वाढवली जाणार आहे. यावर्षी महाविद्यालयातून ५० विद्यार्थी पोलीस, वनरक्षक व इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच कॅम्पस मुलाखतीद्वारे १४१ विद्यार्थी बँक व औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे नियुक्त झाले आहेत.

या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड तसेच सर्व विश्वस्त व महाविद्यालयीन परिवाराने प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी व डॉ. विलास सुद्रिक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading