सरकारी कर्मचाऱ्यांचा निर्णय योग्यच पण पोलिसांचे देखील कामाचे तास कमी करा.
दिनांक १४ फेब्रुवारी,मुंबई:
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २९ तारखेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे दोन दिवस सुटी असेल.
मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोलीसानानाही कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भरती करून कामाचे तास कमी करावेत अशी मागणी केली आहे.ट्वीट करत त्यांनी राज्य सरकारकडे हि मागणी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे.
त्याबरोबर पोलिसांनाही त्यांच्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भरती करुन त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा किंवा त्यांना अतिरिक्त कामाचा भत्ता देण्याचा सरकारने विचार करावा.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या आठ तासाच्या ड्युट्या या फक्त कागदोपत्रीच आहेत. तसेच कोणताही सण उत्सव असले कि,पोलिसांना दोन – तीन दिवस घरीही जाता येत नाही. तर अपुरे मनुष्यबलाभावी त्यांना जास्तीची ड्युटी देखील करावी लागते.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली जात होती.
तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसोबतच ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी होती.पण राज्य सरकारने त्यावर निर्णय घेतला नव्हता.अखेर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी याच महिना अखेरपासून होणार आहे.