कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या कपिल गुंड या जवानाच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत भीमा नदी तीरी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

अजनुज,श्रीगोंदा ,दिनांक १९ नोव्हेंबर :  

येथील कपिल नामदेव गुंड वय-२४ वर्षे हे उधमपूर जम्मू काश्मीर, मधील ओडीसेक्टर ,कालापहाड ठिकाणी लष्करी सेवेत कर्तव्यावर असताना, गुरूवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या बॉम्ब स्फोटात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी  सकाळी अजनुज येथे भीमा नदी तीरी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 

     मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी कपिल गुंड हे त्यांच्या सहकाऱ्यां समवेत वरील नमूद ठिकाणी कर्तव्यावर असतांना, रात्रीच्या वेळी अंधारात अचानक मोठा स्फोट झाला.त्यात कपिल व त्यांचा सहकारी हे दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना उधमपूर येथील लष्करी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कपिलला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

              कपिलचा मृतदेह उधमपूर येथून विमानाने पुण्यात आणण्यात आला. पुढे पुण्यातून लष्करी वाहनातून अजनुज त्यांच्या घरी आणण्यात आला.फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून अतिशय शोकाकूल वातावरणात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.गावातील प्रत्येक चौकात व प्रत्येक घरासमोर अमर रहे ,वीर जवान तुझे सलाम चे बॅनर व रांगोळी काढण्यात आल्या होत्या. संपुर्ण गावातून अंत्ययात्रा काढून, अंतिम संस्कारासाठी भीमा नदी तीरी कपीलचा पार्थिव देह नेण्यात आला. भारतीय सेनेच्या जवानांच्या माध्यमातून शहीद कपिल गुंड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपिलच्या मृतदेहावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.ज्या पेटीत कपिलचा मृतदेह आणण्यात आला ,त्या वरील भारताचा राष्ट्रध्वज वडील नामदेव गुंड यांना मुलाच्या विरत्वाचे आणि सर्वोच्य बलिदानाचे प्रतीक म्हणून उपस्थित जवानाच्या हस्ते देण्यात आला.

            खासदार दिलीप गांधी ,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहूल जगताप,श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार ,बाळासाहेब महाडिक,बाळासाहेब गिरमकर ,सुवर्णाताई पाचपुते,तहसीलदार महेंद्र माळी ,प्रभारी पोलीस निरीक्षक करनोर साहेब ,हरिदास आबा शिर्के यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहीद कपिल गुंड चे वडील नामदेव गुंड यांनी पार्थिव देहाला अग्नी दिला.यावेळी लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या फायरी झाडून शहीद जवानाला सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.शहीद जवान कपिल गुंड यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलं, आई ,वडील ,भाऊ असा परिवार आहे.

(माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी या दोन्ही मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जीम्मेदरी परिक्रमा शिक्षण संस्थेने घेतल्याचे यावेळी बोलताना सांगितले आहे.)

लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या फायरी झाडून शहीद जवानाला सलामी दिली..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading