​आगामी आमदार वंचित बहुजन आघाडीचाच – अॅड. अरुण जाधव… 

 श्रीगोंदा दिनांक २२ नोव्हेंबर :        
      राज्यामध्यये सत्तापरिवर्तनाचे वारे वाहू लागले असून येणाऱ्या काळात सत्ता ही वंचित बहुजनांच्या हाती येणार असून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा आगामी आमदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हानिमंत्रक अॅड. अरुण जाधव यांनी श्रीगोंदा येथे झालेल्या बैठकीत केले. यावेळी विचारपीठावर बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, दलित पंथरचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवे, सुरेश चव्हाण, वंचित बहूजन आघाडीचे तालुका निमंत्रक प्रमोद काळे, कांतीलाल कोकाटे उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्ष स्थानी भाऊ पुराणे होते.
    अॅड. अरुण जाधव पुढे म्हणाले की, राज्यात भाजपा-सेनेच्या सरकारला लोक कंटाळले आहेत तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी जिवंत ठेवणाऱ्या दलित, मुस्लीम, भटके-विमुक्त, आदिवासी यांच्या प्रश्नांना कायमच दुय्यम स्थान दिल्याने तसेच सत्ता ही सतत ठराविक लोकांच्या हाती राहिल्याने वंचित बहुजनांतील मोठा समूह त्यांच्या पासून दुरावला असल्यामुळे उद्याच्या काळात गरीब मराठा, ओबीसी, मुस्लीम, भटके-विमुक्त, दलित आदिवासींची मुले तुम्हाला उद्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत दिसलीत असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
    बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे म्हणाले की, शिवसेना आणि भाजप हे अत्यंत ढोंगी पक्ष असून राज्यात त्यांची सत्ता येणार नाही असे चित्र निर्माण झाल्याने हिंदू मते मिळविण्यासाठी भाजपनेच शिवसेनेला राम मंदिराचा बागुलबुवा उभा करायला लावला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचंबरोबर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणायची असल्यास तळागाळातजावून काम करावे लागणार असून ११ युथ ऑन वन बूथ हे समीकरण ठेवून काम करावे लागेल. 
    संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले की, या देशातील जनतेला शिवराज्याची आस लागली असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. संभाजी ब्रिगेडने आत्तापर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विकृती नष्ट करून समस्त मराठा बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आर. एस. एस. प्रणीत भीमा कोरेगाव सारखी दुर्दैवी घटना घडूनही मराठा-दलित वाद पेटला नाही. मराठा आरक्षणाचा ओबीसी-मराठा वाद निर्माण करूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आता आम्ही राजकीय भूमिका घेतल्यामुळे भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संपादन करण्यासाठी वरिष्ठ वंचित बहुजन आघाडीसोबत बैठक घेऊन निर्णय घेतीलच. मात्र आज महाराष्ट्रातील जनतेने डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. 
    यावेळी संतोष साळवे, कारभारी बागुल, राजेंद्र राऊत, दादा कुटे, संतोष जौजाल, मंगेश घोडके, अन्न कोळपे, विशाल मोरे, सोमनाथ भैलुमे, नितीन कळसकर, जावेद शेख, आसाराम काळे, शरद काळे, विलास काळे आदि मान्यवर उपस्थित होते. सदरील बैठक यशस्वी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे श्रीगोंदा तालुका निमंत्रक कांतीलाल कोकाटे व प्रमोद काळे यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply